मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे बंधू हरिशचंद्र अहीर यांचा मुलगा महेश अहीर आणि त्याचा मित्र हरीश धोेटे या दोन तरुणांचे मृतदेह पंजाबची राजधानी चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच हंसराज अहिर ह्यांच्या बंधुंचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते, त्यापाठोपाठ त्यांच्या वडील बंधूच्या मुलाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने अहिर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महेश आणि हरीश बेपत्ता असल्याची तक्रार सात दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आज, बुधवारी या दोन्ही युवकांचे मृतदेह चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले. चंदीगड पोलिसांनी यासंदर्भात चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. चंदीगड पोलिसांनी आत्महत्येचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. सधन तसेच सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या दोन्ही युवकांनी थेट परराज्यात जाऊन आत्महत्या का केली असावी? ही आत्महत्या की हत्या? हत्या असल्यास ह्यांचे कुणाशी टोकाचे शत्रुत्व होते? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असुन हंसराज अहिर ह्यांच्या पुतण्याच्या संशयास्पद मृत्यूने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.