नेरी (चंद्रपूर): जन्मदात्या मुलानेच दारूच्या नशेत आई व पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे बुधवारी (९ ऑगस्ट) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी अरविंद संभा मेश्राम याला अटक करण्यात आली आहे चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील अरविंद संभा मेश्राम हा सकाळीच दारू पिऊन घरी आला.
घरी आल्यानंतर पत्नी कल्पनाबरोबर किरकोळ भांडण झाले. भांडणादरम्यान अरविंदने हातात असलेल्या कुऱ्हाडीने तिच्या हातावर सार्वजनिक रस्त्यावरच वार केला. यावेळी आई पार्वता मध्यस्थी करण्यास गेली असता तिच्याही डोक्यावर वार केला. तिला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पत्नीने चिमूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल
होऊन जखमीला सरकारी दवाखान्यात दाखल केले. घरी पोलीस आल्याचे लक्षात येताच आरोपी अरविंद हा जंगलाचा फायदा घेत पसार होत असताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे विहीरगाव येथील बसस्टँडवरून त्याला अटक केली. याप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात आरोपी अरविंद संभा मेश्राम (३५) याच्याविरोधात भादंवी कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश चावरे, विनोद जांभुळे, बिट अंमलदार मेहरकुरे, पोलीस शिपाई भरत गोडवे, दगडू सरवदे करीत आहे