खबरकट्टा/चंद्रपूर:
सोमवार आणि मंगळवारी जोरदार बरसलेल्या पावसाने बुधवारी उसंत घेतली असली तरी मागील शंभर वर्षात प्रथमच जुलै महिन्यात 242 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 14 ऑगस्ट 1986 रोजी 329 तर 14 सप्टेंबर 1956 रोजी 249.4. मि.मी. पाऊस झाला होता.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या नावावर जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्याने अख्खे चंद्रपूर शहर पाण्यात बुडाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी केला आहे.
शहरात 18 जुलै रोजी चोवीस तासात 242 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी 14 ऑगस्ट 1986 रोजी 329, 14 सप्टेंबर 1956 रोजी 294.4, 14 जुलै 1984 रोजी 254, 4 जुलै 2006 रोजी 230, 16 जुलै 2013 रोजी 134, 4 जुलै 2016 रोजी 130, 30 जुलै 2019 रोजी 132.9, 24 जुलै 2022 रोजी 112.8 पावसाची नोंद झाली होती. वरोरा तालुक्यात 18 जुलैला 228 मिमी, मूल 5 ऑक्टोबर 1903 रोजी 275, ब्रम्हपुरी 31 ऑगस्ट 1986 ला 323, चिमूरमध्ये 9 ऑगस्ट 1927 रोजी 335.5 पाऊस झाला होता. 18 जुलै रोजी महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 24 तासांत 276 मिमी तर देशात कत्रा येथे 315 आणि पकल दुल येथे 296 मिमी पाऊस झाला. यावरून चंद्रपूर पावसाच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसऱ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर होते.#khabarkatta chandrapur
मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी रस्त्यांवर, रस्त्याचे पाणी लोकांच्या घरात, व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरले. लहान मुले शाळेत अडकली होती. 2013 पूर्वी नगरपरिषद असतानाही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. नगरपरिषदेचा कारभार महापालिकेपेक्षा बरा होता, अशा शब्दात कक्कड यांनी संताप व्यक्त केला. महापालिका स्वच्छता कर, मालमत्ता कर वसूल करीत असूनही स्वच्छतेच्या नावावर नागरिकांची फसवणूक करीत आहे. जयंत टाकिज चौक, आदर्श पेट्रोल पंप, वाहतूक शाखा, सिटी हायस्कूल, साईबाबा मंदिर, तुकूम परिसरातील मुख्य रस्ता आणि इतर रहिवासी परिसराला तलावाचे स्वरूप आले. या परिस्थितीला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोपही कक्कड यांनी केला आहे.#khabarkatta chandrapur