खबरकट्टा/चंद्रपूर :
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा येथील सफारीसाठी मुंबईतील कुटुंब आले होते. सफारी दरम्यान पर्यटकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. केशव रामचंद्र बालगी (71) असे मृतक पर्यटकाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.#khabarkatta chandrapur
ताडोबातील वाघ बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक ताडोबाला भेट देत असतात. रविवार आणि महाराष्ट्र दिनाची सुट्टी आल्याने दोन दिवस मोठ्या संख्येने पर्यटकांनी ताडोबात सफारीचा आनंद घेतला. मात्र, सोमवारी घडलेल्या घटनेने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडलं. पर्यटकात शोककळा पसरली होती.#khabarkatta chandrapur
मुंबई येथील काळा आंबा परिसरात वास्तव्य असलेले केशव रामचंद्र बालगी हे कुटुंबासोबत ताडोबाला आले होते. ताडोबात सफारीचा आनंद कुटुंब घेत होते. ताडोबातील सौंदर्य बघून सर्व आनंदित होते. याच दरम्यान केशव रामचंद्र बालगी याच्या हृदयात दुखू लागलं. पर्यटन मार्गदर्शक व वाहन चालक यांनी त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ येथे उपचारासाठी हलविले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केशव बालगी यांना मृत घोषीत केले.
हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने केशव बालगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळापूर्वी आनंदात असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पर्यटनासाठी आलेले पर्यटकही हळहळले. ताडोबा प्रशासनाकडून मृत पर्यटकांच्या कुटुंबियाना धीर देण्यात आला. केशव रामचंद्र बालगी यांचा मृतदेह मुंबईला हलविण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur

