बल्लारपूर : शहरातील फूटपाथवर व आठवडी बाजारात बसून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून बाजार कर वसूल नियमानुसार करण्याची मागणी करणारे निवेदन मंगळवारी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना जनहित हक्क समितीच्या वतीने देण्यात आले.#khabarkatta chandrapur
उमेश कडू यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी यांनी यापूर्वी केलेल्या वसुलीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे दिसून आले. व्यावसायिकांकडून मनमानी पद्धतीने कर घेत होते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्यांना धमकावून पैसे उकळायचे. आता हे चालणार नाही. चालू वर्षासाठी 27 एप्रिल रोजी होणाऱ्या निविदांच्या वेळी वसुली कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसावेत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नियुक्तीपूर्वी त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र पोलिसांमार्फत घेतले पाहिजे. जो काही कर ठरवला जात आहे, त्याचे माहिती फलक मोक्याच्या जागी लावावेत जेणेकरून बाजारात बसलेल्या व्यापाऱ्यांनाही किती पैसे भरायचे आहेत, याची जाणीव होईल. वसुली कर्मचार्यांचा गणवेश निश्चित करण्यात यावा, प्रत्येक व्यावसायिकाला कराची पावती देण्यात यावी. कर भरणाऱ्या व्यावसायिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी समिती स्थापन करावी.
मुख्याधिकाऱ्यांनी या मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेत कर्मचाऱ्यांना पोलिस व्हेरिफिकेशन करून देण्याचे, गणवेश ठरवून आणि फिरून व्यवसाय करणाऱ्यांकडून कर वसूल न करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात उमेश कडू, स्वामी रायबराम, सागर राऊत, प्रकाश तावाडे, पराग जांभुळकर, नारद प्रसाद यांचा समावेश होता.#khabarkatta chandrapur

