खबरकट्टा/चंद्रपूर :
नवरत्न स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शनात चमकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील 30 विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून इस्रो दौऱ्यासाठी रवाना केले. 29 एप्रिलपर्यंत त्यांचा हा शैक्षणिक दौरा चालणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये अंतराळविषयक ज्ञानात भर पडावी, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या पुढाकाराने नवरत्न स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले योग्य ध्येय ठरवावे, संशोधक व चिकित्सक व्हावे, परीक्षेत केवळ गुण मिळाले पाहिजे, असा अट्टहास न करता एक चांगला माणूस म्हणून आपले जीवन कसे जगता येईल, यादृष्टीने प्रयत्नशील असावे, असा सल्ला इस्रो दौऱ्याला यापूर्वी सीईओ जॉन्सन यांनी दिला.#khabarkatta chandrapur
यावेळी अतिरिक्त मुख्य 'कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूळकर उपस्थित होते. दौऱ्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, उप शिक्षणाधिकारी (प्राथ.) विशाल देशमुख यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे व निकिता ठाकरे, गटशिक्षणाधिकारी व शिक्षक आदी उपस्थित होते.
अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात भर पडेल. त्याचप्रमाणे परिसरातील इतर प्रेक्षणीय स्थळांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती संग्रहित करता येईल. पर्यावरण व इतर भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होईल, असे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.#khabarkatta chandrapur

