खबरकट्टा/चंद्रपूर: राजुरा, तालुका प्रतिनिधी - अपडेटेड बातमी
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी कोळसा खाणीच्या एंट्री गेट वर दोन सुरक्षा रक्षकांच्या डोक्याला बंदूक लावुन कोल माफियांनी तीन ट्रक आत कोल स्टॉक वर नेले आणि तेथून कोळसा भरून त्याच पद्धतीने बाहेर घेऊन गेले.
या तक्रारीवर राजुरा पोलिसांनी तातडीने तपास करीत या संपूर्ण घटनेचा उलगडा केला आहे. या प्रकरणी तक्रार करणारा महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान नितीन चौधरी हाच आरोपी निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका मध्यस्तासह तीन ट्रक मालक अशा एकूण पाच आरोपींना शिताफीने अटक केली आहे. मात्र अद्याप ट्रक चालक व अन्य काही आरोपी फरार असून या तिन्ही कोळसा भरलेल्या ट्रक चा अद्याप तपास लागला नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा वेकोलिच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 मार्च ला सकाळी वेकोलिच्या कोळसा खाणीत कार्यरत महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुरक्षा जवान नितीन चौधरी हा राजुरा पोलीस ठाण्यात आला आणि त्याने सात अज्ञात फडके बांधुन आलेल्या इसमांनी आपल्या डोक्याला बंदूक लावून दहशत निर्माण करून तीन ट्रक कोळसा भरून नेल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी तातडीने तपास केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांच्या तपासात दहशत निर्माण करणारी अशी कुठलीच घटना घडली नसून सर्व काही संगनमताने झाल्याचे उघड झाले. तक्रारकर्ता आरोपी सुरक्षा जवान नितीन चौधरी याने बल्लारपूर येथील शुभम बहुरिया याचे जवळून 40 हजारांची रक्कम घेऊन त्याबदल्यात तीन ट्रक कोळसा भरून देणार असल्याचे सांगितले. मात्र हे नोंदणी न करता आलेले तीन ट्रक इतर सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले, याची माहिती सुरक्षा गार्ड नी इतरांना दिली. मात्र तोपर्यंत हे तिन्ही ट्रक कोळसा घेऊन पसार झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी नितीन चौधरी वय 31, शुभम बहुरिया, वय 28, राहणार बल्लारपूर, तीन ट्रक मालक अनुक्रमे परमितसिंग उर्फ प्रीतम चड्डा वय 31, राहणार बल्लारपूर, सय्यद सुहेल सय्यद कबीर वय 30, राहणार राजुरा, प्रणव ढवळे वय 34, राहणार गडचांदूर या एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या पाचही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेत पोलिसानी तक्रारीवरुन हत्यार कायदा व दहशत माजविण्याचा व अन्य कलम नोंदवून तपास सुरू केला. मात्र घटनेनंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाल्याने जुने कलम वगळून भादंवी कलम 379 व 120 (ब) नुसार गुन्हा नोंदविला आहे.
ही कार्यवाही चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा ठाणेदार योगेश्वर पारधी आणि त्यांच्या चमूने केली.
--------------------------------
राजुरा :प्राथमिक बातमी :
येथील पवनी कोळसा खाण – 2 मध्ये बंदुकीच्या बळावर अज्ञात आरोपींनी दोन 14 चक्का हायवा व एक 12 चक्का हायवा कोळसा लुटलयाच्या घटनेने वेकोली सह जिल्हा प्रशासनात खळबळ उडवून दिली
सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे विभाग (LCB)ने स्वतःकडे घेऊन धडाकेबाज कामगिरी करत कोळसा लुटून नेणारे वाहनाची ओळख ही पटली असून कोळसा खाली केलेल्या जागेची माहिती ही पटली आहेअवघ्या चोवीस तासात एवढया मोठ्या प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या एल.सी.बी व राजुरा पोलीसची संपूर्ण टीम ही कौतुकास पात्र आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्ता आपल्या शब्दावरून फिरला कधी बंदूक तर कधी चाकु असल्याचा आपल्या बयानात सांगू लागला त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने धक्कादायक माहिती दिली असून या प्रकरणात अनेक वेकोलीचे अधिकारी शामिल असल्याचे ही कळत आहे पोलिसी चौकशी नंतर कोळसा तस्करीतील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे ?
परिसरातील नागरिकांनी आपण यापूर्वी ही दोनदा बंदुकीच्या फायरिंगची आवाज ऐकले असून नंतर त्याला दिवाळीचे फटाके जाहीर केल्याची आश्चर्यकारक माहिती ही दिली