भद्रावती तालुक्यातील देऊरवाडा – माजरी रस्त्यावरील शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजताचे सुमारास घडली. या घटनेत मृतकच दोषी असल्याचे मृतकावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मधुकर महादेव आसुटकर (40) रा.देऊरवाडा असे विजेच्या धक्क्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. देऊळवाडा – मांजरी रस्त्यावर मधुकर यांची शेती आहे. त्या शेतीला लागून असलेली राजूरकर यांची शेती ठेका पद्धतीने केली. तिथे सोयाबीन पिकाची दुबारा पेरणी केली होती. पिकाला पाणी देण्यासाठी ते नेहमीच पहाटे शेतात जात होते.#khabarkatta chandrapur
या पिकांच्या संरक्षणासाठी व जनावरांच्या बंदोबस्तासाठी शेतात जिवंत विद्युत प्रवाहाचे तारे लावून ठेवत होते . घटनेच्या दिवशी सकाळी शेतावर गेल्यावर विद्युत प्रवाह बंद करण्याचा त्यांना विसर झाल्याने त्या प्रवाहाच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकाची पत्नी वारंवार फोन करत असल्याने मधुकर फोन का उचलत नाही म्हणून ती शेताकडे गेली असता हा प्रकार उघडकीस आला घटनेचा पुढील तपास पोलीस शिपाई प्रकाश देरकर करीत आहे.
