महाराष्ट्रात विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र होणार?, प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे प्रस्ताव दिल्याची माहिती # - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



महाराष्ट्रात विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र होणार?, प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे प्रस्ताव दिल्याची माहिती #

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रित घ्याव्यात, असा प्रस्ताव प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती आहे.Assembly and Lok Sabha elections will be combined in Maharashtra? State BJP has submitted a proposal to the central leadership 3 days ago.


विशेष म्हणजे केंद्रीय नेतृत्व या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी 'एप्रिल-मे' दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार का?, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. 'द हिंदू' या वृत्तपत्राने केंद्रीय मंत्र्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

एकत्र निवडणुका भाजपसाठी फायदेशीर

'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राज्यातील विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबतच घ्याव्यात, असा महाराष्ट्र भाजपचा सूर आहे. कारण शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे कडवे आव्हान असणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीही आक्रमकपणे निवडणुकांना सामोरे जात आहे. आघाडीतील पक्षांची युती घट्ट दिसत आहे. अशा स्थितीत विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबत घेणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.

शिंदे सरकारचा प्रभाव पडण्यास वेळ

विशेष महाराष्ट्र भाजपने याबाबतचा अहवालही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती आहे. या अहवालानुसार, शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचा प्रभाव दिसून येईपर्यंत बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे या प्रभावातून केवळ राज्य सरकारच्या कामगिरीवर निवडणुका जिंकणे हे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि राष्ट्रीय मुद्दे यांचा प्रचारात वापर करता येईल. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हवाल्याने 'द हिंदू'ने हे वृत्त दिले, हे मात्र सांगण्यात आलेले नाही.

विधानसभा, लोकसभेसोबत स्थानिक निवडणुकाही?

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सध्या अधांतरीच आहेत. सुप्रीम कोर्टात अद्याप या निवडणुकांबाबतची सुनावणी सुरू झालेली नाही. सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी आता 28 मार्च ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्रित झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकाही तेव्हाच होणार का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

...तर मविआत फूट पडण्याची शक्यता

'हिंदू'च्या वृत्तानुसार, महाराष्ट्र भाजपने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, विधानसभा व लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढली तर त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणावर बसू शकतो. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत हे चित्र दिसले. याऊलट मविआच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्यास त्याचा फायदा भाजपला होते. विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्र घेतली तर मविआतील घटक पक्षांमध्ये जागा वाटप, प्रचाराचे मुद्दे आणि इतर काही कारणामुळे फूट पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचा गट सध्या दुबळा आहे. काँग्रेसला अद्यापही सूर गवसला नाही. अशा स्थितीत मविआ एकत्र लढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केवळ आपल्याच उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करतील. त्यामुळे भाजपला फायदा होईल.

निवडणूक आयोगाचीही तयारी

दरम्यान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही दोनच दिवसांपूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्यावर भाष्य केले आहे. निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिल्यास दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्यास आमची तयारी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले आहेत. दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशपांडे हे निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी 17 मार्च रोजी भंडाऱ्यामध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोणतीही निवडणूकीची तयारी महिनाभरात पुर्ण होत नाही. त्यासाठी खुप वेळ लागतो. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी सध्या राज्यभर दौरा करत आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती घेण्यासाठी हा दौरा असल्याचे ते म्हणाले होते.

Pages