स्वित्झरलँडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत उद्योग लावण्यासंदर्भात करार करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्राच्या असतानाही सरकारने या विदेशी कंपन्या असल्याचे सांगून संभ्रम निर्माण केला होता. याबाबत लोकमत या वृत्तपत्राने ने या कंपन्यांचा बोगसपणा उघडकीस आणला होता. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही ही बाब मान्य करीत, या कंपन्या महाराष्ट्रातीलच असल्याचे त्यांनी मान्य केले.
दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच :मात्र, ते म्हणाले की, विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी सरकारने हा करार केला होता. परंतु देशी कंपन्यांना विदेशी दाखविण्याची गरज का पडली? हे त्यांनी स्पष्ट केले नाही. सामंत यांनी रविवारी रत्नागिरीहून सोशल मीडिया लाइव्हद्वारे याचे स्पष्टीकरण दिले. याप्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळावर बोट ठेवले. ते म्हणाले की, ठाकरे सरकारच्या काळात त्यांनी काही केले नाही. आता ते आरोप लावत आहेत. त्यांनी स्पष्ट करावे की अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी किती कंपन्यांशी करार केला होता.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांंत ज्या तीन कंपन्यांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्या तीनही कंपन्या महाराष्ट्रातीलच असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने एका कंपनीच्या संचालकांशी बोलून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला असता या वस्तुस्थितीची पुष्टी झाली.
1. अमेरिकन कंपनी न्यू एज क्लिनटेक सोल्यूशन प्रा. लि.
ही कंपनी इटखेडा, औरंगाबादची आहे. त्याची नोंदणी 2 जून 2022 रोजी झाली. अधिकृत भागभांडवल 3 कोटी आणि पेडअप कॅपिटल 154 कोटी रुपये आहे. गोपीनाथ लटपटे, बाळासाहेब दराडे आणि निहित अग्रवाल हे संचालक आहेत. कॉर्पोरेट सर्टिफिकेशन म्हणजेच सीईएन क्रमांक यू 14200 एमएच 2022 पीटीसी 383095 आहे. ही कंपनी 20 हजार कोटींचा कोळसा गॅमिफिकेशन प्लांट उभारणार आहे.
2. फेरो अलॉय प्रा. लि.
ही कंपनी इंग्लंडची असल्याचे दर्शविले आहे. मात्र, ती जालन्यातील आहे. 17जुलै 2017 रोजी या कंपनीची नोंदणी झाली. त्याचे अधिकृत भागभांडवल 10 लाख आणि पेडअप कॅपिटल 1 लाख रुपये आहे. गौरव कासट आणि दीपेश माधनी हे संचालक आहेत. ही कंपनी 1520 कोटी रुपयांचा एक स्टील प्लांट उभारणार आहे.
3. राजुरी स्टील अँड अलॉय इंडिया प्रा. लि.
ही कंपनी इस्रायल/युरोपची असल्याचे नमूद आहे. ही मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. 12 जून 2010 रोजी नोंदणी झाली. त्याचे कार्यालय मुलुंड, पश्चिम मुंबई असे नमूद आहे. अधिकृत भागभांडवल 18 कोटी 50 लाख रुपये आहे आणि पेडअप कॅपिटल 18 कोटी 48 लाख 84 हजार 992 रुपये आहे. संचालकांमध्ये मोनिका जैन आणि विवेक बेरीवाल यांचा समावेश आहे. सीआयएन क्रमांक यू 28999 एमएच 2010 पीटीसी 204100 आहे. ही कंपनी मूल एमआयडीसीमध्ये 600 कोटी रुपये खर्चून पोलाद प्रकल्प उभारणार आहे.

