गाणार येणार ; की जाणार...!? शिक्षक मतदारसंघात वाढली चुरस : नागपूरच्या मतांवर उमेदवारांचा डोळा - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गाणार येणार ; की जाणार...!? शिक्षक मतदारसंघात वाढली चुरस : नागपूरच्या मतांवर उमेदवारांचा डोळा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक -2023
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी रंगत वाढू लागली आहे. 30 जानेवारी रोजी होत असलेल्या या निवडणुकीसाठी एकूण 22 उमेदवार उभे असले, तरी या मतदारसंघाचा इतिहास बघता विमाशि आणि मराशिप या शिक्षक संघटनांचाच दबदबा असल्याचे दिसून येते. विमाशिने 1987 पासून तब्बल पाच निवडणुका जिंकल्या आहेत तर मराशिपने तीनवेळा बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही संघटना प्रतिस्पर्धी म्हणूनच पहिल्या वा दुसऱ्या क्रमांकावरच होत्या.

1987 मध्ये विदर्भ विभागातून विमाशिचे म. न. काळे निवडून आले. त्यानंतर नागपूर व अमरावती हे महसुली विभाग वेगळे झाल्यामुळे 1980 मध्ये नागपूर विभागातून विमाशिचे प्र. य. दातार निवडून आले. 1986 मध्ये मराशिपने दिवाकर जोशी यांच्या रूपाने विश्वनाथ डायगव्हाणे यांचा पराभव करून या मतदारसंघावर आपले नाव कोरले.

मात्र, त्यानंतर 1993,1998 व 2004 मध्ये सलग तीनवेळा विमाशिचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी या मतदारसंघाला विमाशिचा गड केला. 2010मध्ये मात्र विमाशिमध्ये फूट पडली. परिणामी नागो गाणार यांनी डायगव्हाणे यांचा पराभव करून 17 वर्षांनी मराशिपने ही जागा पुन्हा जिंकली. 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत विमाशिने चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांच्याऐवजी आनंदराव कारेमोरे यांना उमेदवारी दिली.
परिणामी संघटनेतील नाराजीचा थेट फायदा गाणारांना झाला व ते दुसऱ्यांना आमदार झाले. या मतदारसंघाचा इतिहास बघता निवडणुकीचे चित्र लक्षात येते. 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी ते जनता दल (यू) या पक्षाकडून लढत आहेत. त्यांना काँग्रेसने समर्थन न दिल्याने ते बॅकफूटवर दिसत आहेत. दुसरीकडे भाजपने गाणारांसाठी ताकद लावली असली, तरी त्यांच्याच संघटनेत काम करणारे वर्धेचे अजय भोयर हे मैदानात उतरल्याने गाणारांची डाेकेदुखी वाढली आहे.

मतांच्या विभाजनाचा फायदा कुणाला?

या निवडणुकीसाठी जवळपास 40 हजार मतदार असले तरी एकट्या नागपूर जिल्ह्यात 16हजार मतदार आहेत. या मतांवर डोळा ठेवून नागपूर जिल्ह्यातून तब्बल 12 उमेदवार उभे असल्याने मतांची विभागणी कशी होते, यावर सारे काही अवलंबून आहे. यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

Pages