जलयुक्त शिवार 2.0 अभियानाची अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जलयुक्त शिवार 2.0 अभियानाची अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
जलयुक्त शिवार अभियान यापूर्वी 2015 ते 2019 या कालावधीत राबविण्यात आले होते. इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे, पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षरताद्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर याकरीता प्रयत्न करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातुन करणे तसेच उपलब्ध भुजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरीता जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अभियानाची जिल्ह्यातील यंत्रणेने प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0 संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) पल्लवी घाटगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर तसेच विविध यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, यापूर्वी 2015 ते 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान 1.0 राबविण्यात आले होते. या कालावधीतील कामाची सद्यस्थिती तपासून घ्यावी. गाव आराखडा तयार करतांना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहिल. त्यामुळे पाणलोट क्षेत्रनिहाय गावाची निवड करावी. तालुकास्तरावर गठीत समित्यांच्या बैठका घेऊन कामाचे नियोजन करावे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जलसंधारण कामांचा अहवाल सादर करावा.
मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय 3 जानेवारी 2023 अन्वये, जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्या अन्वये तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती कार्य करेल. तालुकास्तरावर जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारणाच्या कामाची माहिती तयार करावी. जलयुक्त शिवार टप्पा- 2 मध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील.

नवीन गावांच्या समावेशाबाबत एकूण गावांची यादी संबंधित विभागाकडून तयार करावी. तसेच समावेश करण्यात येणाऱ्या गावांची यादी अद्यावत करावी. अवर्षणप्रवण गावांची यादी संबंधित विभागाकडुन मागवावी तसेच जिल्हास्तरावर मास्टर लिस्ट तयार करावी. पहिल्या टप्प्यात बऱ्याचशा गावाची निवड झाली परंतू कामे अपुर्ण आहेत. अशा गावातील अपुर्ण कामे पुर्णत्वास न्यावी. गावातील लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर द्यावा. जलयुक्त शिवार व अमृत सरोवर अंतर्गत शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेली गाळयुक्त शिवार व गाळमुक्त धरण योजनेच्या कामाची माहिती घ्यावी.

गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे. या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवणक्षमता पुन:स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होण्यास मदत मिळेल. त्यामुळे जे शेतकरी स्वत:हुन गाळ नेण्यास तयार आहेत त्यांना गाळ उपलब्ध करून द्यावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली.

Pages