खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा प्रतिनिधी -
ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शितल आमटे-करजगी यांनी सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास आनंदवनातील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्याने केल्याचे उघडकीस आले. डॉ. शितल यांच्या आत्महत्येने परिसरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. शितल आमटे यांच्या खोलीतून पोलिसांनी एक लॅपटॉप, तीन भ्रमणध्वनी संच, मोठ्या प्रमाणात औषधीसाठा, लसीचे सिरिंज आणि कपडे ताब्यात घेतले असून, भ्रमणध्वनी संचातील मजकुराची तपासणी केल्यानंतर चौकशीला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांचे बयांन नोंदविले आहे.लवकरच आमटे कुटुंबीयांचीही बयाणे नोंदविण्यात येणार आहेत. गौतम करजगी यांनी नोंदविलेल्या बयाणात 30 तारखेला काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
30 नोव्हेंबर ला सकाळच्या सुमारास शीतल आमटे यांचे सासरे व सासू या कोविड टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले होते, त्यावेळेस शीतल आमटे यांनी सासू-सासऱ्यांना मास्क लावण्याचा सल्ला देत बाहेर आल्या होत्या, त्यांचे पती गौतम करजगी हे काही कामानिमित्त बाहेर गेले व त्यांचा मुलगा घराबाहेर खेळत होता.काही वेळानंतर गौतम करजगी हे परत आले त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता, त्यांनी खिडकीतून बघितले असता शीतल आमटे या स्तब्धपणे खुर्चीवर बसल्या होत्या, मात्र दरवाजा उघडत नसल्याने गौतम करजगी यांनी दरवाजा खोलून आत शिरले मात्र डॉ. शीतल यांच्या शरीरात काही हालचाल होत नव्हती, त्यांनी कृत्रिम श्वास सुद्धा दिला असता त्यांच्या तोंडून पाणी निघाले लगेच त्यांनी डॉक्टरला पाचारण केले मात्र डॉक्टरांनी शीतल आमटे यांना मृत घोषित केले.
डॉ. शितल यांच्या कार्यालयातील सिसिटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी ज्यांच्याशी संपर्क केला, संवाद साधला त्या सर्वांशी संपर्क करणे सुरू आहे. त्यांचेही म्हणणे विचारात घेतले जात असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथील फॉरेन्सीक चमुने तीन तास तपासणी करून खोलीतील आवश्यक काही वस्तू ताब्यात घेतल्या असून, त्यांचाही अहवाल अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी या घटनेच्या चौकशीसाठी पथके तयार करून तपासाला सुरूवात केली आहे. दोन दिवसात योग्य निष्कर्षापर्यंत पोहचू, अशी आशा डॉ. पांडे यांनी व्यक्त केला.

