एकच व्यक्ती, एकच वेळी शाळेत मुख्याध्यापक अन् बॅंकेत लिपिकही! #anilmusale - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



एकच व्यक्ती, एकच वेळी शाळेत मुख्याध्यापक अन् बॅंकेत लिपिकही! #anilmusale

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

कोरपना तालुक्यातील, नांदा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव अनिल मुसळे यांनी एकाच वेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक व शाळेत मुख्याध्यापक अशी दोन पदांवर नोकरी करून दोन्ही ठिकाणी पगार उचलून शासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून शाळेत मुख्याध्यापक पद बळकावल्याचे चौकशीत उघडकीस आले असून सात दिवसात मुसळे यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय यापूर्वीही बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ही शाळा संचालित करणाऱ्या संस्थेचे सचिव अनिल मुसळे यांनी स्वतःचीच मुख्याध्यापक पदी केलेली नियुक्ती बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत सिद्ध झाले आहे. 

मुख्याध्यापक अनिल मुसळे यांची नियुक्ती रद्द करण्याचा प्रस्ताव सात दिवसात सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच माजी जिल्हा परिषद सदस्यांची पत्नी योगिता कुडमेथे व संस्थेचे सचिव मुख्याध्यापक डॉ.अनिल मुसळे या दोघांवरही शिक्षिकेची बोगस भरती केल्या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली होती. सध्या अनिल मुसळे जामिनावर बाहेर आहेत. मात्र अशातही मुसळे यांची बनवाबनवी सुरूच आहे. यावेळी तर मुसळे यांनी चक्क राज्य शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.


सविस्तर असे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा द्वारा संचलित श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, नांदा या शाळेचे मुख्याध्यापक पदी डॉ. अनिल रामचंद्र मुसळे रुजू होण्यापूर्वी ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर येथील मुख्य शाखेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांना मुख्याध्यापकपदी रुजू व्हायचे असल्याने त्यांनी ७ फेब्रुवारी २०१० ला लिखित राजीनामा बँकेकडे सादर केला. बँकेच्या प्रक्रियेनुसार संचालक मंडळांनी ८ जून २०११ ला राजीनामा मंजूर करून त्यांना बँकेच्या सेवेतून सेवामुक्त केले. मात्र बँकेतून सेवा मुक्त व्हायच्या अगोदरच १८ मार्च २०१० ला मुसळे यांनी नांदा येथील शाळेत मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वीकारला. १८ मार्च २०१० ते ८ जून २०११ पर्यंत ते बँकेच्या सेवेत कार्यरत होते. त्यामुळे अनिल मुसळे यांची मुख्याध्यापक पदावरील नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी अहवालात म्हटले आहे. राजीनामा दिल्यानंतरही मुसळे यांनी सेवेतून मुक्त होईपर्यंत सलग १५ महिने बँकेकडून वेतन उचलले. त्यामुळे ८ जून २०११ पर्यंत ते बँकेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. 

अशा प्रकारे मुसळे यांनी एकाच वेळी कनिष्ठ लिपिक व मुख्याध्यापक पदावर काम करून दोन्ही पगार उचलून शासनाची दिशाभूल केली. तसेच शिक्षण विभागाच्या नियमानुसार मुख्याध्यापकपदी नियुक्तीसाठी किमान पाच वर्ष सहाय्यक शिक्षकाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मुसळे यांनी तुकडोजी महाराज विद्यालय भालर, भास्करराव ताजने माध्यमिक विद्यालय कळमना, गुलाब नबी आझाद ज्युनिअर कॉलेज बार्शी या तीन शाळांचा ५ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र जोडले आहे. मात्र चौकशी अंती एकाही ठिकाणी त्यांच्या पदाला वैयक्तिक मान्यता प्राप्त नसल्याचे आढळून आले. यावरून अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी अहवालात म्हटले आहे.

बोगस अनुभव प्रमाणपत्र जोडून मुख्याध्यापक पद बळकावणारे मुसळे यांच्यावर सात दिवसात कारवाई करावी असे शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना म्हटले आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी हे संस्थेचे पदाधिकारी व संचालकांवर विश्वास ठेवून शाळेसंदर्भात कार्यवाही करीत असतात. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा या संस्थेने शासनाची वेळोवेळी दिशाभूल केली असून १४ वर्षांपूर्वी झालेली नियुक्ती अवैध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक बोगस नियुक्ती प्रकरणात संस्थेलाही तेवढेच जबाबदार समजण्यात येत आहे. तसेच सर्व संचालकांवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

Pages