खबरकट्टा/चंद्रपूर:
यवतमाळ : मुलगी गरिबाची असो की श्रीमंताची वडिलांसाठी ती ‘पापा की परी'च असते. पण हीच परी अनेकांना ओझे वाटते. तिला परक्याचे धन मानले जाते. पण हीच 'परी' आता गुणवत्तेचा परिचय देत पित्याच्या आयुष्याला 'परिसस्पर्श' देऊ लागलीय. अशीच एक गुणवान परी आहे समीक्षा राजेंद्र बातुलवार..!
तिने असे काय केले बरे ! इतरांच्या शेतात राबणाऱ्या आपल्या बाबाला ओझे उचलताना पाहून तिचे काळीज द्रवले अन् तिने ते ओझे हलके करणारे यंत्रच बनवून टाकले. या यंत्राने आता केवळ समीक्षाच्या बाबाचेच नव्हेतर कुठल्याही कष्टकरी माणसाचे ओझे हलके होणार आहे. समीक्षा राजेंद्र बातुलवार ही मुलगी राळेगाव तालुक्याच्या पेरका सावंगी गावची रहिवासी. वडील राजेंद्र आणि आई वंदना दोघेही शेतमजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पण मुलगा अभिषेक आणि मुलगी समीक्षा या दोघांनाही खूप शिकवावे ही त्यांची धडपड आहे. पण पुस्तक शिकता शिकता रोजच्या जीवनातूनही बरेच काही शिकता येते हे समीक्षाने सिद्ध केले.#khabarkatta chandrapur