जिल्ह्यात राजकीय गुंडगिरीचा आता अंत होणार असल्याचं चित्र दिसायला लागलं असून नुकत्याच सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना तात्काळ चौकशी चे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दहा पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेला पाठवून वेगाने तपास करण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान या गोळीबारातील एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असल्याची चर्चा असून यात जिल्ह्यातील अनेक व्यक्ती गुंडगिरीच्या रडारवार असल्याची माहिती समोर आल्याची चर्चा आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील एक आजी आमदार,रस्ते बांधकाम व्यावसायिक, एक पुरुष पत्रकार व प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यावर सुद्धा घातपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या हल्ला प्रकरणानंतर काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वरील माहिती चर्चेद्वारे समोर आल्याची शक्यता असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात कधी नव्हे असे राजकीय वरदहस्त असणारे गुंड धुमाकूळ घालत असल्याचे आजवरच्या राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील लोकांवर जीवघेण्या हल्ल्यातून समोर येतं आहे. अर्थात यासाठी अवैध रेती, अवैध कोळसा व दारू वाहतूक यातून गुंडगिरीला उत् आला आहे. त्यामुळे राजकीय स्पर्धेत याच गुंड माफियांच्या वापर करून विरोधकांवर हल्ले घडवून आणल्या जात आहेत असे दबक्या आवाजात आता राजकारणी-व्यावसायिक बोलायला लागले आहेत.
रावत गोळीबार प्रकरणातील आरोपिंचा काँग्रेस चे माजी नगरसेवक नंदू नागरकर मारहाण प्रकरणाशी काही संबंध आहे काय हे सुद्धा तपासून पाहणे आवश्यक झाले आहे.
अर्थात या घटनांमधून जिल्ह्यात राजकीय वर्चस्वाच्या लढाया होतं असल्याचे चित्र मागील काही वर्षात दिसत असल्याने जिल्ह्यात यूपी बिहार सारखी स्थिती होतांना दिसत आहे. त्यातच सीडीसीसी बँकेच्या अध्यक्षांवर झालेला गोळीबार हा नेमक्या कुठल्या कारणाने झाला यांचा तपास लागणार आहे पण जर हा गोळीबार करणाऱ्याना राजकीय सुपारी मिळाली असेल तर मात्र जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा पर्दाफाश होईल का ? याकडे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेले असेल.

