खबरकट्टा/चंद्रपूर :
जिल्ह्यात अमली पदार्थ वनस्पती (खसखस, गांजा) लागवड किंवा पदार्थाची वाहतूक तसेच विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान, कृषी, शिक्षण, पोलिस आदी विभाग अमली पदार्थ विक्री, वाहतूक करणाऱ्यांकडे लक्ष ठेवणार असून जनजागृतीही करणार आहेत.#khabarkatta chandrapur
अमली पदार्थाची जिल्ह्यात कुठे लागवड होत असेल तर कृषी विभागाने कृषी सहायकामार्फत तपासणी करावी. गोपनीय पद्धतीने लोकांकडून याबाबत माहिती मिळवावी, शिक्षण विभागाने शालेय स्तरावर अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करावी. सरकारी किंवा खासगी कुरिअरमार्फत कुठे वाहतूक होते का, याची तपासणी करावी. खासगी कुरिअरधारकांना याबाबत पोलिस विभागाने पत्र लिहून याबाबत अवगत करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.#khabarkatta chandrapur
यावेळी सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, केंद्रीय अबकारी विभागाचे अधीक्षक श्याम सोनकुसरे, डाक अधीक्षक गणेश सोनुने, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त उमाकांत बाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभिजीत लिचडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.#khabarkatta chandrapur
बंद कारखान्यांवर राहणार लक्ष
जिल्हा पोलिस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती संकलित करून त्याबाबतचा डेटाबेस तयार करावा लागणार आहे. एन.डी.पी.एस. अंतर्गत गुन्ह्यांचे तपास अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेणे तसेच जे कारखाने बंद आहे त्यावर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.

