गडचिरोली : पोलिस अधीक्षकांना आलेल्या निनावी पत्राद्वारे खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांचा भंडाफोड झाला आणि पोलिस बनू पाहणाऱ्या पाच जणांना बेड्या पडल्या. जिल्हा पोलिस दलातील 2021 च्या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली रुजू झालेले दोन पोलिस शिपाई आणि तात्पुरत्या यादीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेले तीन उमेदवार अशा पाच जणांना 22 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. दरम्यान, ही प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यातील असल्याचे उजेडात आल्याने पोलिसांनी बीड कनेक्शनच्या दिशेने तपास वळवला आहे.#khabarkatta chandrapur
राकेश देवकुमार वाढई (29, रा. आलापल्ली, ता. अहेरी), वैभव दिलीप झाडे (26, रा. नवेगाव, ता. मुडझा) या दोन पोलिस शिपायांसह तात्पुरत्या यादीतील आकाश रामभाऊ राऊत (26), मंगेश सुखदेव लोणारकर (26, दोघे रा. नवेगाव), . मिन्नाथ पुरुषोत्तम थोरात (29, रा. खरपुंडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन फरार आहेत.#khabarkatta chandrapur
जिल्हा पोलिस दलात चालक पोलिस व पोलिस शिपाई पदासाठी 2021 मध्ये जाहिरात निघाली होती. नोव्हेंबर 2022 पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यावर होती. अचानक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना एक निनावी पत्र प्राप्त झाले. त्यात भरती प्रक्रियेत तसेच मागील पोलिस भरतीत देखील काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली येथील एका व्यक्तीच्या मदतीने बीड जिल्ह्यातील खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करून नोकरी मिळवल्याचा उल्लेख होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या पत्राआधारे चौकशीचे आदेश गुन्हे शाखेचे पो. नि. उल्हास भुसारी यांना दिले.#khabarkatta chandrapur
एकाच मालमत्तेचे दोघांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे
पो.नि. भुसारी व उपनिरीक्षक दीपक कुंभारे यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार करून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेल्या चार उमेदवारांचे प्रमाणपत्र हे बीड जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. तसेच मागील भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड होऊन पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेल्या पाच उमेदवारांपैकी दोन उमेदवारांचे प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यातील असल्याचे आढळले.

