यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. शुक्रवारी बँकेतून रोकड घेवून मुलासह दुचाकीवरून निघालेल्या एकाचे दोन लाख 76 हजार रुपये दिवसाढवळ्या हिसकावून पळ काढल्याची घटना शहरातील मध्यवर्ती भागातील सराफा लाईनमध्ये घडली. या धक्कादायक प्रकारामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे. #Khabarkatta
माळीपुरातील बाफना दालमीलजवळ राहणारे लक्ष्मीनारायण राधेश्याम प्रताप हे पीएनजी कंपनीमध्ये ड्राव्हर म्हणून काम करतात. त्यांनी सध्या घराचे बांधकाम काढले आहे. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास श्याम टॉकीजजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य शाखेत ते पैसे काढण्यासाठी मुलगा सागरसह दुचाकीवरून आले होते. बँकेतून दोन लाख 76 हजार रुपयांची रक्कम काढून त्यांनी ते कपड्याच्या लाल पिशवीमध्ये ठेवली आणि दुचाकीवरून ते मुलासह माळीपुरातील घराकडे निघाले.
सराफा लाईनमधील महाकाली ज्वेलर्स समोरुन ते जात असताना श्याम टॉकीजकडून काळ्या रंगाच्या होंडा युनिक मोटारसायकलवरून भरधाव वेगाने दोघे आले. त्यातील समोर बसलेल्या इसमाने काळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते. तर दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाच्या डोक्यावर काळ्या रंगाची टोपी होती. 35 वयोगटातील या तरुणांनी भरधाव वेगात येवून लक्ष्मीनारायण प्रताप यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे बॅलन्स सांभाळत मुलाने पाय टेकवून गाडी उभी केली असता दुचाकीवरील भामट्याने दोन लाख 76 हजार रुपये असलेली पिशवी हिसकावून बालाजी चौकाकडे पळून गेले. या घटनेनंतर लक्ष्मीनारायण प्रताप यांनी आरडाओरड केली. तर मुलगा सागर याने गाडीचा पाठलाग केला. परंतु भरधाव वेगाने दोन्ही भामटे पसार झाले. त्यानंतर प्रताप यांनी मुलासह पोलिस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली.#Yavatmal