यवतमाळ : वणी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली. तालुक्यातील वडगाव टीप आणि पाकळगाव (झरपट) येथे होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनांनी तालुक्यात हळहळ व्यकत होत आहे. गणपत एकनाथ गेडाम (52, रा. वडगाव टीप) आणि सूर्यभान महादेव बोढाले (70, रा. पाकळगाव झरपट) असे या मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
गणपत गेडाम यांनी रविवारी आपल्या घरी विष प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत पाकळगाव येथील सूर्यभान बोढाले यांनी रविवारी रात्री शेतात विष प्राशन केले. सोमवारी सकाळी मजूर शेतात गेल्यानंतर त्यांना सूर्यभान निपचित पडून दिसले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.