जिवती : तालुक्यातील टेकामांडवा हद्दीतील गोलेवारगुडा येथील एका 24 वर्षीय तरुणाचा शेतातील कडूलिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. मात्र, तरुणाची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी करत शवविच्छेदनानंतर मृतदेह दोन तासांपासून चौकात ठेवत सखोल चौकशी करून आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.#khabar katta chandrapur
संतोष राजेंद्र शिंदे (24, रा. गोलेवारगुडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. संतोष 28 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान बाहेर जाऊन येतो, असे आपल्या आईला सांगून स्प्लेंडर दुचाकी घेऊन बाहेर पडला. उशिरापर्यंत आपला मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या आई-वडिलांनी ठिकठिकाणी फोन करून विचारणा केली. 29 मार्चलाही तो कुठेच सापडला नाही. मात्र, 30 मार्च रोजी संतोषचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.#khabar katta chandrapur
शवविच्छेदन करून आणलेला मृतदेह गाडीतच नातेवाईकांनी दोन तासांपासून चौकात ठेवला. ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून, जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेण्यात येणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस कार्यवाही सुरू होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार एस. पी. मडावी पुढील तपास करत आहेत.