चिमूर - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.#khabarkatta
या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता आणि त्यांचे पती चिमूर येथे राहतात. 11 तारखेला सायंकाळी साडे सातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह पीडित यांच्या घराच्या बाहेर आले. त्यांनी पीडितेच्या पतीला शिवीगाळ करून त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरले आणि पीडितेच्या पतीला मारहाण करत बाहेर घेऊन आले. या मारहाणीला विरोध केला असता, त्यांचा विनयभंग केला आणि मारहाण केली असा आरोप पीडितेने केला आहे.
तसंच, भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांनी पीडिता, त्यांचे पती आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांना मारहाण केली. पीडितेचे भासरे हे त्याच वेळी घरी पोहोचले, त्यांनीही भांगडिया यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना देखील मारहाण करण्यात आली, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे... या तक्रारीनंतर भांगडिया यांच्यासह त्यांच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांविरुद्ध कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका वाद काय?
तक्रारकर्त्या पीडित महिलेचे पती याने समाजमाध्यमावर आमदार भांगडीया व त्यांच्या पत्नी विषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर हा वाद निर्माण झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याबाबत आमदार भांगडीया यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
