धक्कादायक:किर्रर्र अंधार अन् दुचाकीच्या पुढे पाच फुटांवर वाघ - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



धक्कादायक:किर्रर्र अंधार अन् दुचाकीच्या पुढे पाच फुटांवर वाघ

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
सावरगाव (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातील नागरिकांच्या तोंडून अलीकडे वाघ दर्शनाच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. यात काही रंजक तर काही अत्यंत भीतिदायकही आहेत. बुधवारी तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या हस्तिनापूर गावालगत अशीच एक अंगावर भीतीचा काटा उभा करणारी घटना घडली, आणि पुन्हा एकदा हस्तिनापूरवासीय वाघाच्या दहशतीने भीतिग्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील हस्तिनापूर येथील एलआयसी अभिकर्ता असलेले आनंद उरकुडा कुंभारे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी काम आटोपून सिंदेवाहीहून पळसगाव जाट - वाढोणा मार्गे अजय वासुदेव लाडे या मित्रासोबत दुचाकीने या मार्गावरच असलेल्या हस्तिनापूर येथे जात होते. दरम्यान, मानकादेवी मंदिर परिसरातील झुडपी जंगलातून अंधारात त्यांना वाघाचे डोळे चकाकताना दिसले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी दुचाकी सुरूच ठेवली. तेवढ्यात समोरून टॅक्टर येत असल्याने आणिरस्ता अरुंद असल्याने आनंद कुंभारे यांनी गाडी थांबविली. सोबतच जीवनापूर येथील अनुकूल भास्कर खोब्रागडे यांनीसुद्धा पळसगाव येथील स्वतःची मोबाइल शॉपी दुकान बंद करून आले असता तिथे गाडी थांबविली. तेवढ्यात पट्टेदार वाघाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पल्ल्यावर उडी मारली आणि दोन्ही पंजांनी पल्ल्याला लोंबकळत पकडले. 

मात्र ट्रॉलीतील लोकांनी आरडाओरड सुरू केल्याने तो खाली उतरला आणि थेट त्यांच्या गाडीसमोरच आला. वाघ आणि त्यांच्यात केवळ पाच फुटाचेच अंतर होते. मात्र, वाघ काही करण्याच्या अगोदरच कुंभारे यांनी गाडी सुरू केली आणि गाडीचा एक्सीलेटर वाढवून जोराचा आवाज केला. तर तिकडे ट्रॅक्टरचा आवाज यामुळे वाघ गोंधळला आणि जंगलात पळून गेला. ते दोघे वाघाच्या तावडीतून बालंबाल बचावले. हा सारा घटनाक्रम गुरुवारी आनंद कुंभारे व त्यांच्या मित्रानी 'लोकमत'शी बोलताना कथन केला.

या परिसरातील तिसरी घटना

या अगोदरसुद्धा हस्तिनापुरातील आनंद कुंभारे यांच्या तरुण पुतण्याचा घराजवळच्या शेतात काम करीत असताना वाघाने पाठलाग केला होता. मात्र, प्रसंगावधान साधून मुलाने तिथून पळ काढीत थेट घराकडे धाव घेऊन जीव वाचविला होता. तर दुसऱ्या घटनेत वाढोणा येथील मेडिकलचे मालक पवन बोरकर व पुंडलिक बोरकर हे याच मार्गावरून गावाकडे येत असताना मानकादेवी मंदिर परिसरातच त्यांच्या दुचाकीच्या मागे शंभर फूट अंतरापर्यंत पट्टेदार वाघाने पाठलाग केला होता. आता ही तिसरी घटना आहे. दरम्यान, या तिन्ही घटनेतील हा एकच वाघ असावा असा नागरिकांचा कयास आहे.




Pages