येथील माता माता मंदिर वॉर्डात तंबाखूची साठवणूक व विक्री करणार्या आरोपी मनिष पंजवानी यास चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या व्यवसायिकांकडून 2 लाखापेक्षा जास्त तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्य एक विक्रेता फरार झाला आहे.
शहरात तंबाखू व गुटखा विक्रेत्यांनी चांगलाच जम बसविला आहे. शासनाच्या बंदी आदेशाला केराची टोपली दाखवून व्यवसाय केला जात आहे. सध्या आंबेडकर चौक, नेहरू चौक, गांधी चौकासह नाका क्रमांक 3, पंचायत समिती व आसिफाबादकडे जाणार्या मार्गावरच्या काही दुकानात खुलेआम तंबाखूची साठवणूक व विक्री केली जात आहे.
या व्यवसायिकांचा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून बेधडकपणे सुरू आहे. पण आजतागत नाममात्र कारवाई वगळता कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने व्यवसायिकांचे चांगलेच फावत आहे. दरम्यान माता मंदिर वॉर्डात तंबाखूची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती कळताच चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून 2 लाखापेक्षा जास्त तंबाखू जप्त केला आहे.