रोपवाटिकशेतकरी महिला प्रगतीची वाट; गत हंगामरोपांची विक्री - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



रोपवाटिकशेतकरी महिला प्रगतीची वाट; गत हंगामरोपांची विक्री

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
"नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेला किडरोग मुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही बाब ओळखून कोरपना तालुक्यातील निमणी येथील महिला शेतकरी माधुरी भोंगळे यांनी प्रगतीची वाट धरण्यासाठी रोपवाटिका योजनेचा लाभ घेतला. गत हंगामात शेतीला लागणार्‍या खर्चापेक्षा त्यांना दुप्पट नफा रोपवाटिकेने मिळवून दिला.

माधुरी भोंगळे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. यापूर्वी कपाशी आणि तूर ही पारंपरिक पिके घेऊन थोडाफार नफा त्यांच्या पदरी पडत असे. अशीच शेती करण्यापेक्षा काहीतरी नवीन प्रयोग करू, अशी कल्पना त्यांचे पुतणे निखील यांनी घरच्यांसमोर मांडली. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो, हे त्यांनी पटवून दिल्यावर माधुरी यांनी या योजनेकरीता अर्ज केला. योजनेसाठी इतरही शेतकर्‍यांचे अर्ज आले होते. ईश्वर चिठ्ठीनुसार माधुरी यांना शेडनेट मंजूर झाले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात त्यांनी 10 गुंठ्ठे जागेवर रोपे लावून विकसित केली. यात मिरची, वांगे, कोबी, टमाटर, कांदे, काकडी, पत्ताकोबी आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, मे-जानेवारीपर्यंत झालेल्या हंगामात त्यांच्या रोपवाटिकेतून तब्बल साडेचार लक्ष रोपांची विक्री करण्यात आली आहे. यात सर्वाधिक 4 लक्ष रोपे मिरचीची असून, वांगे 20 हजार रोपे, कोबी 15 हजार रोपे व इतर रोपांचा समावेश आहे. गत हंगामात त्यांना सर्व लागत खर्च 3 लक्ष रुपये आला. रोपे विक्रीतून त्यांनी 6 लाखांचे उत्पन्न घेतले असून, शेतीखर्च सोडून निव्वळ नफा 3 लक्ष रुपये मिळाल्याचे माधुरी भोंगळे यांनी सांगितले. आपल्या शेतीमध्ये शासकीय योजनेतून सौरउर्जेवर कृषीपंपसुध्दा असल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्ह्यातील जवळपास 700 पेक्षा जास्त the nursery शेतकर्‍यांना 2021-22 आणि 2022-23 या दोन वर्षात दरवर्षी रोपवाटिकेतून मिरची, फुलकोबी, वांगी, टोमॅटो, पत्ताकोबी, कांदा इत्यादी भाजीपाला वर्गीय रोपे पुरविण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांचा रोपे तयार करण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली. शिवाय नामांकित कंपन्यांच्या बियाण्यापासून तयार केलेली दर्जेदार रोपे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देता आल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना झाल्यामुळे कृषी विभागाची ही योजना अत्यंत उपयोगी सिद्ध झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी सांगितले.

Pages