खबरकट्टा/ चंद्रपूर:
आज मोठ्या प्रमाणात शासकीय पदांसाठी रिक्त जागा भरण्याची मोहीम शासनाद्वारे राबविण्यात येत आहे व येत्या काळात आणखी जागा निघणार आहेत. स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून परीक्षा पास करायची म्हणजे हवी पुस्तके,अभ्यासाचे वातावरण,वेळापत्रक व अभ्यासाचे मायक्रो नियोजन.
परीक्षेची तयारी करतांना पुस्तक वाचन करून संक्षिप्त नोट्स काढणे हे कमप्राप्त ठरते. संगणकाचा योग्य वापर करणे ,अभ्यासक्रमातील विषयाचे तत्कालीन संदर्भ व त्या संदर्भाचा चालू संदर्भ ,अवांतर वाचन करण्याने अभ्यास समृद्ध तर होतोच शिवायएकंदर स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन विस्तीर्ण होतो. अवांतर वाचन किमान एक तास करणे आवश्यक आहे यात पेपर वाचन, नियतकालिके वाचन,कथा कादबरी वाचन तसेच नियमितपणे एक ते दोन चांगल्या दर्जाचे वृत्तपत्र वाचणेही आवश्यक आहे. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची एकमेव जागा म्हणजे मनपा अभ्यासिका.
सद्यस्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेची 4 अभ्यासिका/वाचनालये आहेत. या अभ्यासिकांमध्ये महात्मा गांधी वाचनालय येथे – 19,251 पुस्तके,हुतात्मा स्मारक वाचनालय –5477 ,बॅ. राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिका – 1245, श्री. श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी अभ्यासिका येथे - 812 पुस्तके अशी एकुण 26785 पुस्तके वाचनास उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक अभ्यासिकेत 50 ते 100 विद्यार्थी बसण्याची क्षमता असुन बसण्याची योग्य व्यवस्था,फॅन, लाईट, पिण्याचे पाणी, उन्हाळ्यात कुलर अश्या विविध सुविधा देखील उपलब्ध आहेत.
या सर्व अभ्यासिका/वाचनालये निःशुल्क असुन यात विविध पुस्तके जसे स्पर्धा परीक्षा, कादंबरी, कवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेखसंग्रह, ग्रंथ, शब्दकोश, मासिके, साप्ताहिके, पत्रके, कादंबरी, कवितासंग्रह, कथासंग्रह तसेच इतर अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. सर्व अभ्यासिका / वाचनालय यांची वाचन वेळ ही सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंतची आहे.स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मनपा अभ्यासिका उपयुक्त असुन या निःशुल्क अभ्यासिकांचा लाभ गरजु व होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावा.
आज शहरातील अनेक होतकरू, गरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. शहरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करून शहराचा लौकिक वाढवावा असा चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

