नागपूर ला हलविले : माजी मंत्री बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराची धडक - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नागपूर ला हलविले : माजी मंत्री बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराची धडक

Share This
प्रहारचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली.

 खबरकट्टा / महाराष्ट्र : 11 जानेवारी - 5:30 PM -

"प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा आमदारबच्चू कडू यांचा बुधवारी पहाटे अपघात झाला. अज्ञात भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथील खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर दुपारच्या वेळी त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या डोक्याला चार टाके घालण्यात आले. कठोरा नाका ते कठोरा जकात नाक्यादरम्यानच्या आराधना संकुलापुढे हा अपघात घडला.

             
बुधवारी सकाळी सहा ते 6:15 वाजेच्या सुमारास बच्चू कडू हे कुरळपुर्णा येथून अमरावती येथील घरी आले. वाहनातून उतरून डिव्हायडर पार करत रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. बच्चू कडू रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच, उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने त्याच मार्गावरील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.


बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, आ. कडू यांच्या चालक व खासगी सचिवाने धडक देऊन पळणाऱ्या त्या वाहनचालकाचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.


त्यात तो देखील कोसळल्याची माहिती आहे. दुपारी आ. कडू यांना नागपूर येथे हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येथील रूग्णालयात सामान्यांसह राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची रिघ लागली होती.

बच्चू कडू कालच मुंबईहून अमरावतीत

विशेष म्हणजे बच्चू कडू मंगळवारीच मुंबईहून अमरावतीला आले होते. तर, मंगळवारी रात्री कुरळपुर्णा येथे गेले होते. अमरावतीत परततताच त्यांना अपघात झाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

अज्ञाताविरूध्द गुन्हा : 

याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आ. बच्चू कडू यांचे चालक गौरव भोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी वाहनधारकाविरुद्ध अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली. कठोरा मार्गावरील एका गृहसंकुलासमोर हा अपघात झाल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.

----------------------------------------------------------
खबरकट्टा / महाराष्ट्र :11 जानेवारी -9 AM


अमरावतीत बच्चू कडू यांना हा अपघात झाला आहे. कडू मंगळवारी मुंबईहून अमरावतीला पोहचले होते. सकाळी रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने कडू यांना धडक दिली. या अपघातात कडू यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यात ४ टाके पडले तर पायालाही मार लागला आहे. अमरावतीच्या खासगी रुग्णालयात कडू यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर अद्याप पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात मुंडे यांच्या छातीला मार लागल्याने तेदेखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. तर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत कदम यांच्या वाहनाचा मागील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही.

राज्यातील रस्ते अपघातात रोज अनेकांचे जीव जातात. मागील वर्षी आमदार विनायक मेटे यांचाही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात झाला. या अपघातात दुर्दैवाने मेटे यांना जीव गमवावा लागला होता. मेटेंच्या मृत्यूनंतर रस्ते अपघाताबाबत विधानसभेतही या मुद्द्यावर चर्चा झाली होती. रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं तातडीनं पाऊल उचलणं गरजेचे आहे. त्याचसोबत वाहन चालकांनीही सतर्कता बाळगायला हवी. वाहनांच्या वाढत्या वेगावर नियंत्रण ठेवायला हवं. वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहने चालवली तर रस्ते अपघाताताचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल.

Pages