रामनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खबरकट्टा /चंद्रपूर :
चंद्रपूर येथील व्यावसायिक तथा पूर्ती सुपर बाजारचे संचालक गिरीश चांडक यांच्या रामनगर येथील निवासस्थानी चोरीची घटना शुक्रवार 17 डिसेंबर रोजी उजेडात आली. आरोपींनी घरातून तब्बल 21 लाखांची रोकड लंपास केली. दरम्यान, घटना उजेडात येताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रामनगर परिसरात चांडक यांचे निवासस्थान आहे. शुक्रवारी गिरीश चांडक हे रोकड ठेवून असलेल्या खोलीत गेले असता तब्बल 21 लाखांची रोकड लंपास असल्याचे दिसून आले. घरी चौकशी केल्यानंतर लगेच त्यांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली.
रक्कम मोठी असल्याने पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्वत: घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनास्थळ रामनगर हद्दीत येत असल्याने रामनगरचे पोलीस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. शिवाय श्वान पथक, फिंगर पिंट पथकही घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने घराशेजारीच घिरट्या मारून काही अंतरापर्यंत जाऊन परत आले.
पोलिसांनी चांडक यांच्या घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल तोडलेली आढळून आली. त्यामुळे आरोपींनी पूर्वनियोजनकरून रोकड लंपास केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.