४१ गावातील ३२५ शेतकरी झाले सहभागी
खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा :
चंद्रपूर जिल्हातील राजुरा तालुक्यात मिरची पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवट केली जाते. यावर्षी वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे व लांबत गेलेल्या पावसामुळे मिरची सारख्या अतिसंवेदनशील पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. शेतकऱ्यांना मिरची पिकाच्या व्यवस्थापनात आणि नियोजनामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने ‘मिरची पिक परिसंवाद’ कार्यक्रम राजुरा येथे १६ नोव्हेबरला आयोजित केला होता. या कार्यक्रमात जिल्ह्याभरातील ४१ गावातील ३२५ शेतकरी सहभागी झाले. या कार्यक्रमाला नागपूर येथील मिरची व भाजीपाला पिक तज्ञ श्री. रणजीत आवळे-पाटील व राजुरा तालुका कृषी अधिकारी श्री. विठ्ठल मकपल्ले हे उपस्थित होते. रणजीत आवळे-पाटील यांनी मिरचीवर येणारे विविध रोग, त्यांची लक्षणे व त्यावरील उपाययोजना वापर सविस्तर मार्गदर्शन केले तर श्री. मकपल्ले यांनी शेतीमधील समस्या निवारणासाठी संघटीत प्रयत्नाचे महत्व अधोरेखित केले.
कृषक स्वराजच्या वतीने संस्थेचे संस्थापक व संचालक सतीश गिरसावळे यांनी भारतातील शेतकी क्षेत्राची सध्यस्थिती, अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, शेतकरी उत्पादक कंपन्यांची गरज, कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीचे ध्येय व उदिष्ट्ये याविषयी चर्चा केली.तसेच कंपनीच्या वतीने राजुरा तालुक्यातील शेतकऱ्याची आर्थिक व सामाजिक स्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष आकडेवारी स्वरुपात शेतकऱ्यांना सादर केले.
शेतीतील उत्पादकता वाढावी, शेतमालाची गुणवत्ता सुधारावी, शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेतमालाला योग्य भाव मिळवा यासोबतच पर्यावरणीय समतोल राखला जावा आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न प्राप्त व्हावे यासाठी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न चालू झाले आहे.
शेती आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी जागतिक बाजारपेठेत टिकू शकेल अशा गुणवत्तापूर्ण व पर्यावरणकेंद्री शेतकऱ्यांच्या मालकीच्या पिकनिहाय मूल्यसाखळ्या तयार करणे हे कृषक स्वराजचे ध्येय आहे.