खबरकट्टा /चंद्रपूर :कोरपना :
कोरपना ते वणी हा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून चौपदरीकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांच्या नेतृत्वात नुकतेच देण्यात आले.
कोरपना ते वणी या दोन जिल्ह्याला जोडणारा महामार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नेहमी रेलचेल असते. दिवसागणिक या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु, सद्यस्थितीत या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वाहतूकदार व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून चौपदरीकरण केल्यास या परिसराचा विकास होण्यासाठी मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नागपूरपासून कोरपनापर्यंत १७५ किलोमीटरपर्यंत थेट प्रवास करण्यासाठीसुद्धा सोयीचे होणार आहे. त्यामुळे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करून चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी युवती जिल्हाप्रमुख स्वाती देवाळकर,विजय पानघाटे व भाजयुमोचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.