आगामी चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष बांधणी व विस्तार ह्या उद्देशाने मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा महापालिका निरीक्षक प्रविण कुंटे पाटील ह्यांनी आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू केली असुन पक्षाच्या पाठिंब्याशिवाय चंद्रपूर महापालिकेत महापौर होणार नाही अशी भुमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
कालपासून पक्षाच्या वॉर्ड व प्रभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन त्याचप्रमाणे आज पक्षाच्या सर्व आघाडय़ांच्या बैठका प्रविण कुंटे पाटील ह्यांनी घेतल्या असुन महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करणे त्याचप्रमाणे संघटनेत चैतन्य निर्माण करणे ह्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. समविचारी पक्षांची आघाडी व्हावी ह्यासाठी कुंटे ह्यांनी इतर सर्व पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली असुन आमदार किशोर जोरगेवार ह्यांच्याशी सुद्धा सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील महा आघाडी सरकार सारखेच शहरात आघाडी करून निवडणुक लढण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
जर आघाडी झाली नाही तर स्वबळावर लढण्यास आम्ही तयार आहोत हे सांगतानाच राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय महानगर पालिकेत कुणीही महापौरपद मिळवू शकणार असा त्यांनी दावा केला आहे हे विशेष. आघाडी झाली नाही तर सर्व 66 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देण्यास तयार असल्याचे सांगतानाच आघाडी झाल्यास किती जागांवर दावा करणार ह्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.पत्रकार परिषदेला प्रविण कुंटे पाटील ह्यांचे सह जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, सुखदेव वंजारी, कादीर शेख, सुनिल काळे उपस्थित होते.