कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत.
म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च 7 लक्ष रुपयांच्या वर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांच्यावरचा आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने खनिज विकास निधीतुन रु.5 लक्षपर्यंत इंजेक्शनच्या खर्चास राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष लाभ 29 मे पासून सुरू होणार आहे.
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथमतः ही मागणी केली होती. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सहा रूग्णालयात म्युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय तसेच सामान्य रूग्णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध नाहीत.
अनेक रूग्ण खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्य रूग्णांना परवडणारा नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील म्युकरमायकॉसीस या आजाराच्या रूग्णांवर खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. इतका खर्च जिल्हा प्रशासनाने उचलावा अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविलेल्या पत्रात मांडली होती.
या आजाराची माहिती व्यापक प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे व्हाट्सअप ग्रुप कार्यान्वित करण्यात आले असून ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून कोरोनातुन बरे झालेल्या व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची माहिती एस.एम.एसद्वारे दैनंदिन घेतल्या जात आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींनी वरचेवर तपासणी करावी, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवणे, तसेच इतर आरोग्य विषयक सूचना जिल्हा प्रशासना मार्फत दैनंदिन देण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजाराचे 69 रुग्ण आढळून आलेले आहे. आजपर्यंत 48 रुग्णांवर उपचार सुरू असून 8 रुग्ण या आजारातून बरे झालेले आहे त्यापैकी वरोरा तालुक्यातील एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे. म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. योग्य वेळी उपचार झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो.


