प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून घडामोडींची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जनसंपर्क विभागाची आहे. मात्र, जनसंपर्क विभागाला अंधारात ठेवून काही अधिकारी हीतसंबंध असलेल्या पत्रकारांनाच परस्पर माहिती देत आहेत. त्यामुळे अन्य माध्यमांना माहितीपासून अनभिज्ञ ठेवण्याचा प्रकार होत आहे. चंद्रपूर महानगर पालिकेत घडणाऱ्या घटना, कारवाई, महत्वाचे निर्णय, बैठक आणि कार्यक्रमामध्ये एका दलाल पत्रकाराचा हस्तक्षेप वाढत असल्याने नगरसेवक-अधिकारी त्रस्त झाले आहेत. तो व्यक्ती पत्रकार असल्याने उघडपणे विरोध करू शकत नसल्याचे नगरसेवक-अधिकारी खासगीत सांगत आहेत.
महानगरपालिकेने चार वर्षांपूर्वीच कायमस्वरुपी जनसंपर्क अधिकारी नियुक्त केला. मात्र अधिकृत माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांमार्फत येण्याऐवजी काही हितसंबंधातील पत्रकारांच्या माध्यमातून बाहेर पडत आहे. अशातच काही पत्रकारांनी मनपात आपले बस्तान मांडले. छोट्या-मोठ्या प्रेसनोट लिहून देण्याचे काम सुरु केले. त्याचा त्याला मोबदला मिळू लागला. आमच्याशिवाय प्रसिद्धीच नाही, अशा तोऱ्यात अधिकाऱ्यांना नाचविणे सुरु केले आणि संधीचे सोने केले.मनपाच्या प्रशासकीय कामात हस्तक्षेप वाढला.
हतबल अधिकारीदेखील मनपात जनसंपर्क विभाग आहे, हे पार विसरून गेले आणि प्रत्येक कारवाई, बैठक असो की दौरे याची माहिती याच हीतसंबंधातील पत्रकारांना देऊ लागलेत. आज, इतकी मोठी जनसंपर्क यंत्रणा असतानाही काही अधिकारी कारवाई करताना केवळ स्वतःच्या चमकोगिरीसाठी हीतसंबंध असलेल्या पत्रकारांनाच सोबत घेऊन जात आहेत. डॉ. दीक्षितांच्या श्वेता हॉस्पिटलवर कारवाई असो की खासगी रुग्णालयातील कोविड रुग्णांची आर्थिक लूट असो. महानगरपालिकेच्या ऑडिटमध्ये उघड होऊनही अन्य प्रसिद्धीमाध्यमांना बातमी देण्यात आली नाही.
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आपले हितसंबंध कायम ठेवण्यासाठी मोठ्या कारवाईच्या बातम्या दैनिक आणि डिजिटल माध्यमांपासून लपवून तर ठेवल्या नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. अतिरिक्त बिलाची रक्कम रुग्णाला तत्काळ परत करावी, असे आदेश महानगरपालिकेने नोटीस बजावून दिले. पण हे आदेश केव्हा दिले, हे मलाच माहिती नाही, असे उत्तर एका जबाबदार अधिकाऱ्याने दिले. त्यांना शासकीय कोविड रुग्णालयासमोर अवैध कोविड रुग्णालयावर धाड घालण्यात आली का? असे विचारले असता त्यांनी माहितीला बगल देत वरिष्ठाकडे बोट दाखविले.
शासकीय कोविड रुग्णालयासमोर डॉ. शफीक शेख यांच्या रुग्णालयावर मनपाच्या पथकाने धाड घालत कारवाई केल्याचे वृत्त काही २-४ मोजक्याच स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झाले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी चौकशी केली असता आश्चर्याचा धक्का बसला. अशी कोणतीही कारवाई झाल्याची अधिकृत माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावरून काही मोजक्याच पत्रकारांना हाताशी घेऊन काही अधिकारी कारवाई करतात, असे दिसून येते. डॉ. शफीक शेख यांच्या रुग्णालयावरील कारवाई आधी मनपाने केल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्यादिवशी जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केल्याचे पत्रक जाहीर झाले.
याचा अर्थ काही अधिकारी आपल्या हितसंबंधातील पत्रकांराला सोबत घेऊन जातात आणि कारवाई करतात, हे स्पष्ट होते. महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी, कंत्राटदार आणि नगरसेवक यांना दबावात ठेवून त्यांच्याकडून वसुलीचे काम हा दलाल पत्रकार करतोय, हे प्रकाशाएवढे सत्य आहे, की पवनदेव देखील नाकारू शकत नाही. याच संबंधाचा फायदा घेत त्याने आपली खासगी वाहने चंद्रपूर महानगरपालिकेत भाडे तत्वावर लावली. त्याच्याच दुसऱ्या सहकार्याने काही अधिकारी आणि नगरसेवकावर दबाव टाकून स्वतःच्या घरबांधकामासाठी रेती, विटा आणि सिमेंटचे जुगाड केले. मागील २ महिन्यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेत सोशल मीडियासह जनसंपर्कासाठी प्रशासनाने निविदा काढली. त्यातही कंत्राट मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. पण, पाठीशी अनुभव नसल्याने प्रयत्न फसले.
आता हे काम नागपूरच्या एका कंपनीला मिळाले. त्यामुळे पत्रकारितेतील आपली दलाली संपते की काय, या भीतीपायी त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. या एजन्सीच्या नावे मनपाची बदनामी सुरु केली आहे. आपल्याला मिळणारी कमाई बंद बंद तर होणार नाही ना, या भीतीपोटी "मृतांच्या ढिगा-यावर मनपाला प्रसिद्धीचा सोस, चोवीस लाखांचे प्रसिद्धीचे कंत्राट" अशा हेडिंगखाली वाहिनीवर वृत्त प्रकाशित केले.
इतकेच नव्हेतर इतर स्थानिक वृत्तवाहिन्याच्या प्रतिनिधींना मद्याची सोय करून देण्याचे आमिष दाखवून त्यांनाही वृत्त प्रकाशित करायला लावले. या "झाबड्या" पत्रकाराने पोलीस आणि आरटीओ विभागातही अशीच दलाली सुरु केली आहे. मागे एकदा पोलिसांच्या हातून "मार" खाताना वाचला हे विशेष.
