यवतमाळ : 17 वर्षीय मुलीचा बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश #dio-yavatmal - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



यवतमाळ : 17 वर्षीय मुलीचा बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश #dio-yavatmal

Share This
खबरकट्टा / यवतमाळ, दि. 28 :


जिल्ह्यात एप्रिल महिन्यात यापुर्वीच जवळपास दहा बालविवाह थांबविण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. पुन्हा एकदा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे एक बालविवाह थांबविण्यात आला आहे.


कळंब तालुक्यातील खैरी येथे मामाकडे वास्तव्याला असलेल्या व मुळच्या सावंगी (पोड) जिल्हा वर्धा येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गोदणी जिल्हा यवतमाळ येथील व्यक्तीसोबत 29 एप्रिल 2021 रोजी विवाह होणार होता. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास लेखी माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी खैरी गावातील पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या मदतीने मुलीच्या नातेवाईकांनी भेट घेऊन मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समुपदेशन केले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगितले.


मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दखल पात्र गुन्हा आहे. याबाबत माहिती देण्यात आली. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यावर मुलीचे लग्न करण्याबाबत लेखी जवाब पदाधिकाऱ्यांना दिला व मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लग्न न करण्याचे ठरविले.


सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व कळंबचे ठाणेदार अजीत राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. बाल विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुर्रेवार, अंगणवाडी सेविका जोत्स्ना राऊत, पोलीस पाटील ज्योती चव्हाण, आशा स्वयंसेविका वनिता वरझडकर, वसंत चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित पार पडली.


बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. 18 वर्षाखालील मुलगी व 21 वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा एक दखलपात्र गुन्हा असून यामध्ये 2 वर्ष कारावास व एक लाख दंडाची तरतुद आहे. त्यामुळे बालविवाह बाबत नागरिकांनी अतिदक्ष रहावे, तसेच बालविवाह बाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ अथवा चाईल्डलाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले आहे.

Pages