खबरकट्टा/चंद्रपूर:
गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी आष्टी येथे लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने सोनाक्षी मसराम या 12 वर्षीय मुलीला चिरडले. यावरून जिल्ह्यातील वातावरण तापले असून आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सूरजागड टेकडीवरील उत्खनन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. तर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस रामदास जराते यांनी नेत्यांना दोषी ठरवून गंभीर आरोप लावले आहे. यामुळे येत्या काळात सूरजागड प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.#khabarkatta chandrapur
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर दीड वर्षापासून लोह खनिजाचे उत्खनन सुरू आहे. परिणामी दररोज या भागातून शेकडो अवजड वाहनातून खनिजाची वाहतूक सुरू असते. यामुळे या परिसरात रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला या मार्गांवरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खाणीसाठी शेकडो हेक्टरवरील वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी 12 वर्षीय सोनाक्षीचा हकनाक बळी गेला. रस्त्यालगतची शेती उद्ध्वस्त झाली. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, अद्याप विकास कुठेच दिसला नाही.#khabarkatta chandrapur
जिल्हा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून लोकप्रतिनिधीदेखील गप्प राहणेच पसंत करीत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. त्यामुळे जोपर्यंत हा सूरजागडमुळे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत उत्खनन बंद करण्यात यावे अशी एकमुखी मागणी काही काँग्रेस, शेकाप आणि आविस या पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. अन्यथा यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला आहे.#khabarkatta chandrapur

