खबरकट्टा/चंद्रपूर:
कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे काल दिनांक 30 मे रोजी पहाटे दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. एअर ॲम्ब्यूलन्सने काल त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी वरोरा येथील निवास्थानी आणण्यात आले. आज सकाळी निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाली आणि वरोरा-वणी मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा, विदर्भ आणि राज्यभरातून हजारो कार्यकर्ते धानोरकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाल्यानंतर मार्गात ठिकठिकाणी लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. तापत्या उन्हातही लोक रस्त्याच्या दुतर्फा गोळा झाले होते. आज संपूर्ण वरोरा शहर बंद होते. अनेक व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेऊन बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.#khabarkatta chandrapur
मोक्षधामावर वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना नेते विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार प्रकाश जाधव, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय देरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते होते.
अंत्ययात्रेत प्रचंड गर्दी झाल्यामुळे केवळ दोन हजार (अंदाजे) लोकांना मोक्षधामात प्रवेश देण्यात आला. उर्वरित लोकांना बाहेरच थांबावे लागले. यामध्ये सामान्य जनतेसोबत काही नेते आणि कार्यकर्त्यांचाही समावेश होता. तेथूनच लोकांनी बाळू धानोरकरांना अखेरचा निरोप दिला.#khabarkatta chandrapur