‘तो’ विवाहित आहे, हे माहिती असूनही त्याच्या गोड बोलण्यावर आणि त्याच्याकडून मिळत असलेल्या प्रेमावर ‘ती’ भाळली. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर त्यांनी एकमेकांना सर्वस्व अर्पण केले. त्याने तिला लग्न करण्याचा शब्द दिला. जेव्हा तिच्या गर्भात त्यांच्या प्रेमाचे प्रतिक अंकुरत असल्याचे दिसले तेव्हा मात्र त्याने शब्द फिरवला. ‘तो मी नव्हेच!’ असा पवित्रा त्याने घेतला.
त्याच्या या दगाफटक्याने ती आतून-बाहेरून तुटली. जग प्रेम दिवस साजरा करत असताना तिने विषाचा प्याला ओठांना लावला आणि गर्भात अंकुरत असलेल्या जीवासह स्वत:ही मृत्यूस कवटाळले!
हृदय पिळवटून टाकणारी ही प्रेमकथा वणी तालुक्यातील कळमना या गावात घडली. श्वेता (21) असे या प्रेमकथेतील मृत तरुणीचे नाव आहे. तर सचिन रमेश नवले (30) या तरूणाविरूद्ध शिरपूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याला श्वेताच्या मृत्यूप्रकरणी अटक केली.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळमना येथील विवाहित असलेल्या सचिनने गावतच राहणाऱ्या श्वेतास लग्नाचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सचिन लग्न करणारच आहे, या भ्रमात असलेल्या श्वेताने सचिन म्हणेल तेव्हा सर्वस्व त्याला अर्पण केले. गेल्या दोन वर्षांपासून सचिने तिचे शोषण करत होता. यातूनच श्वेता गर्भवती राहिली.