शहरात कुठेही गतिरोधक तयार करायचे असल्यास रस्ते सुरक्षा समितीची अनुमती घ्यावी लागते. कारण अपघात रोखण्यास थेट गतिरोधक हा पर्याय नाही. पण आता तशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेत जाण्याची गरज नाही. आपल्याला वाटेल तिथे, वाटेल तेवढे आणि वाटेल तसे अवैध गतिरोधक आपण तयार करू शकता, कारण मनपा प्रशासनानेच याला मुकसंमती दिली आहे. याचा कळस म्हणजे काही माजी नगरसेवकांच्या अतिशहानपणामूळे शहरातील जटपुरा गेट-रामनगर मार्गावर एक किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 12 अवैध गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे, मात्र दीड महिना लोटूनही यावर कारवाई करण्यास मनपाद्वारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरातील अवैध गतिरोधकांना मनपाने खुली सूट दिली आहे का असा संतप्त सवाल येथून दररोज येजा करणाऱ्या नागरिकांकडून विचारला जात आहे.
गतिरोधक हे अपघात टाळण्याचा हमखास उपाय नाही, म्हणूनच ते उभारण्यासाठी अनेक बाबींचा विचार केला जातो. कारण चुकीच्या पद्धतीने ते बांधल्यास उलट अपघात होण्याचीच शक्यता अधिक असते. रस्ते सुरक्षा समितीकडून गतिरोधक टाकण्यास परवानगी घ्यावी लागते.
मात्र लोकप्रतिनिधी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असे गतिरोधक उभारण्यास दबाव आणतात आणि प्रशासनाचे अधिकारी देखील या दबावाला बळी पडत हे काम करतात, मात्र त्याच्या कुठल्याही निकषांचे पालन केले जात नाही. रवी आसवानी हे चंद्रपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती असताना आपल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी आपल्या वॉर्डातील एका रस्त्यावर तब्बल 8 गतिरोधक तयार करायला लावले. अत्यंत मनमानी पद्धतीने त्यांनी आपल्या वॉर्डात हे गतिरोधक तयार केले. जिथे वाटलं तिथे त्यांनी गतिरोधक तयार केले. यात माजी नगरसेवक देवेंद्र बेले यांनी यांनीही एका अपघाताचे कारण पुढे करत या मार्गावर तब्बल चार गतिरोधक बांधले. हे सर्व गतिरोधक सिमेंटचे बांधले असुन यात कुठल्याही निकषांचे पालन न करता तयार करण्यात आले, यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. लोकप्रतिनिधिंच्या बिनडोकपणामुळे या रस्त्यावरून रोज येजा करणाऱ्यांना अशा नाहक यातना सहन कराव्या लागत आहेत.
अपघात एकीकडे गतिरोधक दुसरीकडे
डिसेंबर महिन्याच्या मध्यरात्री सुरू असलेल्या बापू इटनकर यांच्या पानटपरी बाजूला उभे असलेल्या दोघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले. यात एका मुलाला नाहक प्राण गमवावा लागला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
यानंतर काही दिवसांत या रस्त्यावर आणखी चार गतिरोधक तयार करण्यात आले. मात्र, जिथे अपघात झाला त्या ऐवजी मनमानी पध्दतीने वेगवेगळ्या टप्प्यात हे गतिरोधक तयार करण्यात आले. त्यामुळे अपघात हे केवळ निमित्त होते असे दिसून येत आहे.
नगरसेवकांच्या बिनडोकपणात मनपा सहआरोपी
मनपावर आता प्रशासन बसले आहे, त्यामुळे मनपाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यानुसार देवेंद्र बेले हे देखील आता माजी नगरसेवक झाले आहेत. त्यातही ते जनतेतुन निवडून आलेले नाहीत. 2017 च्या मनपा निवडणूकित दणकून आपटले होते. यानंतर संजय महाडोळे यांच्या निधनानंतर त्या जागी स्वीकृत सदस्य म्हणून बेले मनपावर गेले. मात्र नगरसेवक म्हणून पाच वर्षात ते फारसा प्रकाश पाडू शकले नाहीत. केवळ निषेध करण्यात त्यांनी वेळ घालवला. मात्र नागरिकांच्या समस्या कायम राहिल्या.
अशातच त्यांनी अपघाताच्या नावावर आपली पोळी शेकत गतिरोधक उभारले. विशेष म्हणजे अपघात स्थळापासून गतिरोधक सुरू होण्याऐवजी बेले यांच्या बिअर शॉपीसमोरून हे गतिरोधक सुरू होतात. केवळ आपल्या सोयीसाठी त्यांनी हे गतिरोधक तयार करून घेतले मात्र या बिनडोकपनात मनपा प्रशासन देखील तेवढेच जबाबदार आहेत. कारण माजी नगरसेवकाच्या दबावाला बळी पडत मनपा कर्मचाऱ्यांनी आपले मनुष्यबळ लावत हे गतिरोधक तयार केले. त्यामुळे मनपा देखील यासाठी तेवढीच जबाबदार आहे.
अनेकांचे कंबरडे मोडले
या गतिरोधकांवरून जाताना अनेक नागरिक पडले आहेत. त्यातही दुचाकीने एका बाजूला बसणाऱ्या महिलांचा यात अधिक समावेश आहे. यावर नागरिक आपली संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. प्रा. विद्यासागर बनसोड यांच्या पत्नीला पाठीच्या मणक्याच्या आजार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सुनील तिवारी यांनी देखील यावर तीव्र संताप नोंदवला आहे. मात्र अद्याप मनपाने हे गतिरोधक हटवले नाहीत. याच मार्गावरून शालेय लहान मुलांचे ऑटो जातात अशावेळी या लहान मुलांचा अपघात होण्याची शक्यता असते.
शेतमालाचे नुकसान
चंद्रपूर शहरात गंजवॉर्डात शहरातील सर्वांत मोठे भाजीपाला मार्केट आहे. यातील माल हा याच मार्गाने येतो मात्र वेडेवाकडे गतिरोधकांवर वाहन चालवताना शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना देखील मनपा याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे, ज्यामुळे अन्य ठिकाणच्या लोकांना अवैध गतिरोधक निर्माण करण्यास पाठबळ मिळत आहे. याचाच परिपाक म्हणजे शहरात अनेक रस्त्यांवर अवैध गतिरोधक निर्माण होऊ लागले आहेत.