बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त - उत्पादन शुल्क विभागाची धाड - लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार # - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त - उत्पादन शुल्क विभागाची धाड - लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार #

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल

मूल तालुक्यातील चितेगाव येथील एव्हिजी गोट फार्म येथील बनावट आणि अवैध देशी दारूच्या (Fake liquor) कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून पार उध्दवस्त केले. सुमारे 16 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवार, 25 जानेवारीला सकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे मूल तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

मूलपासून 5 किलोेमीटर अंतरावर असलेल्या चितेगांव शेतशिवारात नागपूर राज्य मार्गाला लागून असलेल्या एव्हीजी गोट फार्म शेळी पालन केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू (Fake liquor) तयार करून विकल्या जात असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर येथील दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विभागाचे पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या ठिकणी धाड टाकली.

यावेळी बनावट दारू तयार करून ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याकरिता लहान आणि मोठ्या प्लास्टिकच्या हजारो रिकाम्या शिश्या व त्यावर चिकटवण्याकरिता रॉकेट देशी दारू (Fake liquor) संत्रा लिहिलेले हजारो स्टीकरचे खोके, प्रवरा देशी दारू प्रवरानगर, जि. अहदनगर असे लिहिलेले खरड्याचे हजारो मोठे खोके, दारू तयार करून शिशीमध्ये भरल्यानंतर त्यांची पॅकींग करण्यासाठी मोठे पॅकींग यंत्र, 14 मोठे निळे ड्रम, तीन खाली ड्रम, मोटार पंप, दारु तयार करण्याचे यंत्र, दारूला संत्र्याचा वास येण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ‘आँरेज इसेन्स फ्लेवर’च्या शिश्या, अरूणा मरसकोल्हे यांच्या नावाचे शेकडो ‘व्हीजीटींग कार्ड’, काही पार्सल खोके, याशिवाय दारू तयार करून विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य असे एकूण 16.50 लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.

पवन उर्फ गोलू वर्मा, राजू शामराव मडावी यांच्यासह अन्य आरोपी फरार आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क मूलचे दुय्यम निरीक्षक संदीप राऊत करीत आहे.

जप्त साहित्य :
स्पिरीट (मद्यार्क) 3080 बल्क लिटर, अवैध बनावट देशी मद्य सद्दष्य द्रावण 500 लिटर, बुचे सिल करणारे यंत्र 1, वेट यंत्र 1, ओरो यंत्र 1, 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या 57 हजार शिश्या, रॉकेट ब्रांडचे बनावट लेबल 1 लाख 50 हजार लेबल, फ्लेवर शिश्या 10, मोटार पंप 1, प्लास्टिक ट्रे 14, सिलेंडर व शेगडी 1, चिकटपट्टी बंडल 3 खोके, बुचे 5 खोके, खरड्याचे पुठ्ठे 3500, बकेट 2, मग्गा 4, रिकामे ड्रम 10, रबर पॉकेट 50, हायड्रोमीटर 1, इसेन्स शिश्या 4, डिंक शिश्या 10, 500 लिटर क्षमतेच्या 2 पाण्याच्या टाक्या, ब्लेंड घुसळ्याची इलेक्ट्रिक रवी 1, दोरीचे 5 बंडल असा 16 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांनी दिली.

Pages