पिकांवरील अळींचे व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पिकांवरील अळींचे व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Share This
"राज्यामध्ये वारंवार वातावरणात बदल होताना दिसत आहे. यामुळे कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानाचा जनसामान्याच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे"

चंद्रपूर, दि. 09: जिल्ह्यात सर्वत्र धुके सदृश्य ढगाळ वातावरणामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या (हेलीकोव्हरपा) अळ्या आढळतात. या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर (10 ते 20 अळ्या/ 10 झाडे) इमामेक्टीन बेंझोएट 5 एस.जी. 4.4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रीनिलीप्रोल 18.5 एस.सी. 2.5 मिली किंवा इन्डोक्झाकार्ब 15.8 टक्के 7 मि.ली. यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील अधिक फरकामुळे धुक्याच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे पिक करपण्याची शक्यता वाटत असल्यास तुषार सिंचन दिल्यास फायदा होतो. तुरी वरील मर रोगासाठी पिकाची दिर्घकालीन फेरपालट अवलंबावी. रोग प्रतिबंधक जाती वापराव्यात. पेरणीपुर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करावी. तसेच शेतात शेणखत किंवा कंपोस्ट खतात एकरी 2 किलो ट्रायकोडर्मा बुरशी टाकून जमिनीत मिसळवावी.
  

गहू पिकावर मावा किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी थायमिथॉक्झॅम 25 टक्के डब्लुजी 10 ते 15 ग्रॅम प्रति 10 ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हावर तांबेरा हा बुरशीजन्य रोग आढळल्यास प्रोपीकोनाझोल 25 टक्के ईसी 90 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा पिकात घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकरी 10 पक्षी थांबे उभारावे, सुरवातीला 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रभावी जैविक नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. विषाणूचा फवारा प्रति हेक्टरी 500 विषाणूग्रस्त अळ्यांचा अर्क 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर (1 ते 2 अळ्या प्रतिमीटर ओळ) इमामेक्टीन बेंझोएट 5 एस.जी.ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रीनिलीप्रोल 18.5 एस.जी. 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के इसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील सर्व पिकावरील सर्व प्रकारच्या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी जैविक बायो-इनपुट 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. बायो-इनाक्युलंट कृषि महाविद्यालय, नागपूर येथील वनस्पती रोगशास्त्र विभागात विक्रीस उपलब्ध आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले आहे.

Pages