नागपूरहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने जात असलेल्या माय-लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या देव्हाडा – माडगी वैनगंगा नदी पुलावर घडली आहे. पूजा इशांत रामटेके (27) व अथर्व इशांत रामटेके (18 महिने) रा. टेकानाका (नागपूर) मृत माय-लेकाचे नाव आहे.सैनिक शाळेत शिक्षक असलेला इशांत रामटेके रा. टेकानाका नागपूर हा सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता.
तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासात असताना पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दिड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील शौचघराकडे गेली, त्यावेळी मुलगा धावत-धावत समोर गेला, काही कळण्याच्या आतच माडगी व देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरुन नदीत पडला. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल जावून ती सुद्धा रेल्वे पुलावर कोसळली.
या घटनेत दिड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर महिलेला पुलाचा मार लागून लटकलेल्या स्थितीत ठार झाली, ही घटना रात्रीदरम्यान घडल्याची प्राथामिक माहिती पोलीसांनी दिली आहे. बराचवेळा झाल्यानंतरही पत्नी व मुलगा परत न आल्याने पतीने धावत्या रेल्वेत शोधाशोध केली. परंतू शोध न लागल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी व मुलगा हरविल्याची तक्रार नोंदविली.
मात्र आज सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंगवर असतांना त्यांना एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत तर मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला घटनेची माहिती रेल्वे पोलीस व करडी पोलीसाना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इशांत रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठविण्यात आले, पुढील तपास करडी पोलीस करीत आहे.