नम्रता आचार्य ठेमस्कर (प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस)
खबरकट्टा /चंद्रपूर:
"मी ज्या दिवशी मंत्री पदाची शपथ घेतली तो दिवस माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस होता, मला कोणतं खात मिळणार मला माहिती नव्हत. मी कॅबिनेट मंत्री पदाची पहील्यांदा शपथ घेत होतो, पण या सर्व जबाबदारी साठी मी आदरणीय सोनिया गांधी यांचे आभार मानतो कारण त्यांनी मला ही संधी दिली. या संधीने माझं आयुष्य बदलून गेले कारण मला असे बघता आले जे मी कधीही माझ्या राजकारणाच्या ३० वर्षाच्या करिअर मध्ये बघितलं नव्हत. इतकी मोठी आपत्ती देशात येईल आणि महाराष्ट्रात त्याचा उद्रेक होईल असे कधीही वाटले नव्हते. मदत पुनर्वसन खाते मिळेल हे माहिती नव्हते. मी सरकार येण्याच्या आधी राज्याचा विरोधीपक्ष नेता होतो त्यामुळे मला नक्कीच उजवे व कामासाठी अधिक वाव असलेले खाते मिळेल असे वाटले होते लोक म्हणायला लागले वडेट्टीवार ला कसे खाते मिळाले?? पण माझा विश्वास स्वत:च्या प्रामाणिकपणावर होता जे खाते मिळाले त्याला न्याय देईल जिद्दीने काम करून या खात्याला नावलौकिक प्राप्त करून देईल अशी खूणगाठ मनाशी बांधली .
कधी नव्हे ते शंभर वर्षातून एकदा येते अशी आपत्ती आली, त्याला सामोरे जाणारे खाते होते आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचा हेडमास्तर बनलो मी, थोडेसे हास्य चेहऱ्यावर आणून राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार अनेकदा कार्यकर्त्यांना हे मनोगत सांगतात" आम्ही देखील नेहमी त्यांना विचारत असतो की भाऊ तुम्ही इतकं काम कस करता?? तुम्ही थकत नाही का? या प्रश्नाचे उत्तर ते नेहमीच आम्हाला मी थकत नाही आणखी किती प्रोजेक्ट करायचे आहे आपल्याला थकून कसे चालेल?? तुम्हाला आणखी काही प्रोजेक्ट सुचत असेल तर सांगा असे उलट आम्हालाच प्रश्न करतात, तेव्हा या माणसाच्या क्षमता बघून आम्ही आवाक होतो.
राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या मंत्री पदाला पुढिल महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. पाचदा आमदार, दोनदा राज्यमंत्री एकदा महामंडळाचे अध्यक्षपद. साधा एन एस यु आय चा कार्यकर्ता ते सध्या महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेले मंत्री कोणी असतील तर ते राज्याचे मदत, पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन बहुजन कल्याण मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार. मंत्रीपद मिळाल्यावर आपल्या जबाबदाऱ्या समजून घेत नाही तोच कोरोनाची चाहूल लागली आणि सर्वात जास्ती काम त्या खात्याला आले ज्या खात्याला कोणी विचारत नव्हते, त्याच खात्याकडे संपूर्ण महाराष्ट्राला संकटातून बाहेर येण्याची जबाबदारी येऊन पडली आणि स्वतःची पर्वा न करता ही जबाबदारी विजय भाऊंनी चोखपणे पार पडली हे म्हणायला नक्कीच वाव आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर लोक अतिशय घाबरलेले होते कोरोना म्हणजे जणूकाही यमसदनी च आपली रवानगी होईल का? अशी देखील भावना अनेकांच्या मनात निर्माण होत होती. त्यामुळे गोंधळ, अफवा, रुगवाढीमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे तसेच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे घोषित झाल्या मुळे संपूर्ण भार आपत्ती व्यवस्थापन या विभागावर आला. संधी मिळाली तर त्याचे सोने कसे करायचे हे विजय भाऊ कडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी कोरोना ऐन भरात असतांना देखील संपुर्ण महाराष्ट्रात दौरे केले दौरे करत असतांना आपल्या पालकत्व असलेल्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची देखील काळजी घेतली.
कोरोनाची पहिली लाट कमी झाली ताळेबंदी हळू हळू शिथिल व्हायला लागली. कोरोना हा विषय कमी होऊन अन्य विकासकामे करता येतील आपला महाराष्ट्र कोरोनाच्या मगरमिठीतुन मुक्त झाला असे वाटत होते पण केंद्र सरकारने अनलॉक सुरू केले टप्याटप्याने ही प्रक्रिया सुरू असतांनाच हळु हळु कोविड ने पुन्हा डोके वर काढले. दुसरी लाट पहिल्या लाटेचा अनुभव असून देखील इतकी भयंकर होती की आता त्या गेलेल्या काळाची आपण कल्पनाही नाही करू शकत, त्याकाळात देखील संपूर्ण महाराष्ट्रात कोविड ने हाहाकार घातला असतांना सुद्धा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार जीवाची जोखीम पत्करून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कोविडचे व्यवस्थापन करण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत होते.
खाते कोणतेही असू दे माणसाचे काम आणि ध्येय यात लोकनुय असेल तर त्यातून सुद्धा लोकांची मने जिंकता येतात. या काळात अनेक विरोधीपक्षातील लोक घराच्या बाहेर निघायला घाबरत होते त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ लोकांना वाचवण्यासाठी फिरणे ही बाब सोप्पी नाही. कोविडची दुसरी लाट कमी होता होता विजय भाऊंना कोरोनाने गाठले त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्या काळात सुद्धा इस्पितळातुन आपले कर्तव्य बजावण्यासाठी विजय भाऊ तत्पर होते. 'अश्यक्य मज शब्द न माहीत प्रयत्न माझा देव' या उक्तीप्रमाणे विजय भाऊंनी मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन हे खाते सांभाळले व ज्या खात्याला कोणी विचारत नव्हते त्या खात्याला नावलौकिक प्राप्त करून दिला.
आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या खात्याला अधिक महत्व प्राप्त झाले असेल तर विजय भाऊंचेच आहे आणि त्या मागे त्यांची मेहनत, त्यांचे व्यवस्थापन, त्यांची दूरदृष्टी, संकट हाताळण्याचे त्यांचे कौशल्य हा सर्व बाबी आहेत. हा आलेख इतका मोठा आहे की तो एका लेखात मांडणे शक्य नाही. मदत पुनर्वसन हे खाते खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात काम करत आहे. धरणाखाली गेलेले गाव असू दे की पूर, तोक्ते चक्रीवादळ, निसर्ग वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यावर केवळ मुंबईच्या एसी कार्यालयात बसून आपल्याला वस्तुस्थिती समजू शकत नाही हे लक्षात घेऊन जिकडे संकटे आली तिकडे धावून जाऊन ग्राउंड लेवल ची स्थिती समजून घेऊन लोकांना सर्वोतोपरी मदत कशी करता येईल या एकाच विचाराने पछाडलेले विजय भाऊ अनेक पत्रकारांना देखील माहिती आहे.नुकतीच त्यांनी कोविड मुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक कुटुंबाला ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.
पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात कोकणात भीषण पूर आला तेव्हा जवळ जवळ ३००ते ४०० किलोमीटर पूरग्रस्त भागात ते फिरले त्यावेळी कितीतरी दिवस त्यांच्या मनाचा आणि शरीराचा थकवा गेला नव्हता. लोकांचे संसार उद्धवस्त झालेले, कपडे नाही अन्न नाही पाणी नाही अशा अवस्थेत असतांना त्याचा आँखोदेखा हाल स्वतः बघून तातडीची मदत त्यांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना केली. प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये भांडी, कपडे यासाठी सानुग्रह निधी देण्यात आला. नागपूर मिहान मध्ये १६०० कोटी रुपये खर्चून त्यांच्या कल्पनेतील डिझास्टर मॅनेजमेंट उभारण्यात येत आहे. माध्यभारतातील इस्त्रायल च्या तंत्रज्ञानावर आधारित नैसर्गिक आपत्ती देखरेख तंत्र या निमित्ताने नागपुरात उभे होत आहे. नैसर्गिक अप्पती च्या वेळी तात्काळ मदत मिळावी म्हणून नैसर्गिक आपत्ती, मदत व इतर अनिवार्य खर्चासाठी जवळ जवळ ११ हजार ३७५ कोटींची तरतूद त्यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुस्थिती समजून मदत तर केलीच पण त्याच सोबत त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम भाऊंनी केले आहे. आपल्या ब्रह्मपुरी मतदारसंघात कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या जवळ जवळ प्रतेक गरीब कटुंबाला त्यांनी स्वतःच्या खर्चातून मदत केली. ऑटो चालकांचा व्यवसाय कोरोना काळात बंद होता त्यांची अडचण समजुन घेऊन ऑटो चालकांना देखील त्यांनी स्वखर्चातुन आर्थिक मदत केली आहे.
मागच्या आठवडयात प्रसिध्द मुलाखतकार राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत आपला जीवनपट उलगडून दाखवताना अनेक प्रश्नांचे रोखठोक उत्तर त्यांनी दिले. एखाद्या विषयावर भूमिका घेतली तर तसूभरही ती मागे घ्यायची नाही असा भाऊंचा बाणा आहे.
विरोधी पक्षात असतांना त्यांना केवळ सहाच महिने विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी मिळाली त्यातसुद्धा त्यांनी काही महिन्यातच विरोधीपक्ष नेता कसा असला पाहिजे याचे उदाहरण घालून दिले. विरोधी पक्षात असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर जर विधानसभेत कोणी सर्वाधिक भाषणे केले असतील तर ते विजय भाऊ वडेट्टीवार आहेत. 'वक्ता दशसहेस्त्रु' उक्ती त्यांना लागू होते आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी, विनोद, मुद्देसूदपणा ही त्यांच्या भाषणची वैशिष्ट्ये आहेत.विजय भाऊंचे भाषण म्हणजे मुलुख मैदान तोफ आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असून माणसातील देव शोधला पाहिजे, माणसाच्या सेवेमध्ये देव आहे देव देवळात नसून तो माणसाच्या सेवा करण्यात आहे, असे राष्ट्रसंताचे विचारा नेहमी ते सांगत असतात व आपली राजकिय वाटचाल ते या विचारांच्या आधारे करत आहेत. मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन या सोबतच त्यांच्या कडे बहुजन कल्याण (ओबीसी मंत्री) हे खाते सुद्धा आहे. ओबीसी या खात्याचे नाव बदलून बहुजन कल्याण असे नामकरण त्यांनी मंत्रीपदाचे सूत्र हातात घेतल्या घेतल्या केले. त्यानंतर ओबीसी ऐक्यासाठी त्यांनी महाराष्ट्र जंग जंग पछाडले लोणावळा इथे ओबीसी ऐक्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना एका व्यासपीठावर आणले.
ओबीसी समाजाला ऐक्याची गरज आहे त्यांचे जीवन समजून घेण्यासाठी ते पारधी, बंजारा अशा भटक्या विमुक्त लोकांच्या,पालं, तांडे, वस्त्या येथे जाऊन त्यांनी या भटक्या विमुक्त लोकांचे जीवन समजून घेतले. चंद्रपूर आणि गडचिरोली येथील ओबीसी समाजाचे वर्ग क आणि ड चे आरक्षण अनुक्रमे ११% आणि ६% होते. कमी झालेले आरक्षण त्यांनी वाढवून दिले. आता हे आरक्षण अनुक्रमे १९% ते १६% झाले आहे. तब्बल १९ वर्षे हा विषय रखडत होता पण विजय भाऊंनी तो निकाली काढला.
ओबीसी समाजासाठी महाज्योतीची स्थापना केली याअंतर्गत ओबीसी विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. मागच्या महिन्यात महाज्योतीचे उपकेंद्र औरंगाबाद इथे सूर करण्यात आले आहे.महाज्योतीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना टॅब चे वितरण करण्यात आले आहे. विजय भाऊ यांच्या माध्यमातून १५० कोटी महाज्योतीसाठी मंजूर झाले आहे. त्यापैकी ४० कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी तयारीकरण्यासाठी क्लासेस सुरू केले आहे. आतापर्यंत २००० ओबीसी मुलाना एमपीएससी तर १००० मुलांना यूपीएससी ची तयारी करण्यासाठी महाज्योतीने काम केले आहे.
मागासवर्गीयांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी शेती व नौकरीचे उत्पन्न वळगण्यात येणार हा महत्वपुर्ण निर्णय त्यांनी अधिच घेतला आहे. महाज्योतीसाठी ओबीसी मुलांना पायलट होता यावे म्हणून पुढाकार घेऊन फ्लाईंग क्लब पुन्हा सुरू केले त्यासाठी निधी दिला. क्लब सुरू झाल्यावर ओबीसी समाजातील २५ मुले निवडून दिली त्यातील ९ मुले भटक्या जमातीतील आहे. आपल्या संपुर्ण खात्याचे योग्य नियोजन त्यांचे असते त्यांचे मॅनेजमेंट एखाद्या परदेशातून मॅनेजमेंट चे शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्याला लाजवेल असे आहे आणि त्याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी येत असतो.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्व प्रथमच भाऊंना मिळाले आहे जवळ जवळ दोन वर्षे कोरोनात गेली राज्यशासना कडे निधीची कमतरता झाली तरी सुद्धा चंद्रपूर जिह्याचा चौफेर विकास सुरू आहे. ब्रह्मपुरी मध्ये त्यांनी गारमेंटस क्लस्टर उभारण्यात पुढाकार घेतला त्या माध्यमातून किती तरी युवतींच्या ग्रामीण भागात कौशल्य विकासाला सुरवात झाली आहे व या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे.
सर्वाधिक रुग्णवाहिका चंद्रपूर जिल्ह्यला मिळाल्या आहेत. फिरता दवाखाना, शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद, समस्यामुक्त गाव या सारखे कितीतरी उपक्रम योजना चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे. कोरोना आता कमी होऊ लागल्याने या पेक्षा अधिक निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी ते खेचून आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे. भाऊं च्या कर्तृत्वाचा आलेख खरतर इतका मोठा आहे की त्यांच्या वर एक पुस्तक नक्कीच लिहिल्या जाऊ शकते कदाचित समोरच्या काळात ते लिहिल्या जाईलही पण इतकं नक्की म्हणू शकते विकासाचे दुसरे नाव म्हणजे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार हे आहे.
येणाऱ्या १४ तारखेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा महासचिव आदरणीय प्रियंका गांधी यांच्या हस्ते गडचिरोली सारख्या मागास भागात मुलींना शिक्षसाठी शाळा, महाविद्यालयात जाणे सुलभ व्हावे म्हणून १० हजार इलेक्ट्रॉनिक सायकल वाटप करण्यात येणार आहे. चंद्रपूर चे पालकमंत्री असून देखील आपली कर्म भूमी गडचिरोली आहे म्हणून हा स्तुत्य उपक्रम त्यांनी गडचिरोलीत आयोजित केला आहे.
आपल्या मातृभूमीसोबतच कर्मभूमी चा विसर देखील त्यांनी कधी होऊ दिला नाही यातून कोणत्याही मोठ्या पदावर असले तरी आपले पाय जमिनीवर घट्ट कसे रोवल्या जाईल याची शिकवण त्यांनी दिली आहे. 'लडकी हू लड सकती हूँ' हा प्रियंकाजींनी दिलेला नारा अमलात आणून महिलांना मुलींना प्रगती पथावर नेण्यासाठी सायकल वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी स्वतः सर्व व्यवस्था हातात घेतली आहे. सदर कार्यक्रमात येणाऱ्या मुलींची यादी, त्यांना सुरक्षित ने आण करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था त्याची यादी, कोरोना संबंधी घ्यावयाची खबरदारी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा ते स्वतः करत आहे त्यांचे हे काम ज्यांनी बघितले ते नक्कीच हे कबुल करतील की ते एक उत्तम इव्हेंट मॅनेजर सुद्धा आहे, त्यामुळेच त्यांनी लक्ष घातलेला प्रत्येक कार्यक्रम प्रचंड यशस्वी होतोच.
निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे, त्या साठी ते दिवसा ची रात्र एक करतात प्रचंड परिश्रम घेतात आणि नावाप्रमाणेच विजय खेचून आणतात. मोदी यांच्या प्रचंड लाटेपुढे देखील ते तेवढ्याच निकराने उभे होते. चंद्रपूर जिल्हातील काँग्रेस चे आधारवृक्ष ते आहेत त्यांच्या सोबत काम करतांना एका राजकीय नेत्याने कसे काम केले पाहिजे लोक संग्रह कसा असला पाहिजे, भाषण कसे असले पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे हे त्यांचे सर्व गुण शिकण्यासारखे आहे.
महिलांचा आदर करणे, त्यांना पक्षात अधिकाधिक संधी देऊन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने राजकीयदृष्ट्या महिला सक्षमीकरणावर देखील त्यांचा भर असतो. भाऊ हे कार्यकर्त्यांचे गुण हेरणारे रत्नपारखी आहेत आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गुणांनुसार योग्य संधी ते देतात, त्यांच्या अडीअडचणीत ते धावून जातात त्यांच्या वर अन्याय होत असेल तर त्यांचे रुद्र रूप देखील धारण करतात. अनेकदा कार्यकर्त्यांचं चुकलं तर ते चिडतात पण क्षणार्धात राग विसरून पालकत्वाच्या नात्याने परत आपलेसे करतात. त्यांचे अनेक कार्यकर्ते मागच्या ३३ वर्षांपासून आजही त्यांच्या सोबत आहे याला कारण त्यांचे संवेदनशीलता आणि माया आहे.
विजय वडेट्टीवार हे केवळ नाव नसून राजकारणातील एक चालता फिरता ग्रंथ आहे त्यातून जितके वाचता येईल समजता येईल शिकता येईल तेवढे कमीच आहे. आज या आमच्या विजय भाऊंचा वाढदिवस आहे त्यांना आम्ही सर्व कार्यकर्ते लाख लाख शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उत्तरोत्तर असाच वाढत जाऊन त्याच्या झळाळीने संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशमय होऊ दे हीच सदिच्छा.