वाघांच्या पंढरीतील ताडोबाच्या चार प्रवेशद्वारांपैकी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षितपणाने चिमूर तालुक्यातील रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटक जाण्यास प्राधान्य देत नव्हते. मात्र, नुकतेच झरणीच्या तीन बछड्यांच्या आगमनाने या प्रवेशद्वारावर झरणीच्या परिवाराला बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. त्यामुळे रामदेगी प्रवेशद्वार हाऊसफुल्ल झाले आहे.
वाघांच्या हमखास दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे, तर ताडोबातील कोअरच्या चार प्रवेशद्वारांपैकी व्यवस्थापन मोहर्ली व कोलारा गेटकडेच सुविधा उपलब्ध करून देते आणि बाकी प्रवेशद्वार उपेक्षित असतात.
यामुळेच पर्यटकसुद्धा मोहर्ली व कोलारा गेटवरून ताडोबात जाण्यास पसंती देतात. रामदेगी, खुटवंडा गेटकडे पर्यटक आकर्षित होत नाहीत, अशी खंत रामदेगी, खुटवंडा गेटवरील गाईड, जिप्सी चालक व्यक्त करतात.