- म. रा. प.मं. चे राज्य शासनात विलीनीकरण कशासाठी व का? याकरिता केली जनजागृती.
- अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठिंबा.
- रॅलीतील बालकानी वेधले लक्ष.
खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्य स्तरावर गेल्या चौदा दिवसांपासून कामगारांचा संप सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संपकरी कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या या त्रासाला संपकरी कामगारांपेक्षा शासन जबाबदार असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण कशासाठी व का ? या संदर्भात राजुरा शहरात संपकरी कामगारांच्या कृती समितीच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजुरा शहरातील बस स्थानक येथून सकाळी 11 वाजता या रॅलीला सुरुवात झाली. संविधान चौक, पंचायत समिती जवळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नाका नंबर 3, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, जुने बस स्थानक, तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन मुख्य बसस्थानकामध्ये संदेश रॅलीचा समारोप झाला. तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अनिल काळू याना निवेदन देण्यात आले.
संदेश रॅली ला अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठिंबा होता.या संदेश रॅलीमध्ये अनेक नागरिक व सामाजिक, राजकीय संघटनांना सहभागी झाल्या होत्या. गांधी चौक येथे राधेश्याम अडानिया, सभापती, न. प. राजुरा, सचिन डोहे, रवी बुरडकर यांनी भाजपा च्या वतीने पाणी वाटप केले. नेहरू चौक येथे जीवनदीप पर्यावरण व सर्प मित्र संस्था, कोंडावार, नेफडो च्या तालुका संघटिका किरण हेडाऊ यांच्या चाय व बिस्कीट देण्यात आले. समारोप स्थळी छावा फाउंडेशन च्या वतीने मसाला भात व जिलेबी वितरित करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे राजू झोडे व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष बादल बेले यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांना संबोधित करत आपले समर्थन जाहीर केले. सूत्रसंचालन सुरेश पुट्टेवार यांनी तर आभार मनोज कोल्हापूरे यांनी मानले. एस.टी. कर्मचारी संपकरी कृती समिती ने या रॅलीत सहभागी नागरिकांचे आभार व्यक्त केले.