विस्तार अधिकारी आरोग्य व पाणी पुरवठा कर्मचारी यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक
खबरकट्टा /चंद्रपूर : गोंडपीपरी -
जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोंडपीपरी पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी आरोग्य संजीव दत्तात्रय इनमूलवार व ग्रामपंचायत वेडगाव पाणी पुरवठा कर्मचारी परशुराम भिवाजी गिरसावळे यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
फिर्यादी मौजा वेडगाव गोंडपीपरी येथील रहिवासी आहे, फिर्यादी यांचे जन्मप्रमाणपत्र काढून देण्यासाठी आरोपी इनमूलवार व गिरसावळे यांच्या संपर्कात आले असता दोन्ही आरोपीनी संगनमताने फिर्यादीला जन्म प्रमाणपत्र काढून देतो असे सांगत 3 हजार रुपयांची मागणी फिर्यादीला केली.
तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले मात्र पैसे देण्याची इच्छा फिर्यादी यांना नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे यांनी सदर प्रकरणाची पडताळणी केल्यावर सापळा रचला.
8 ऑक्टोम्बरला गोंडपीपरी पंचायत समितीच्या प्रवेश दाराजवळ विस्तार अधिकारी आरोग्य विभाग संजय इनमूलवार व परशुराम गिरसावळे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, मिलींद तोतरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ संतोष येलपुलवार, पो. कॉ, रविकुमार ढेंगळे, संदेश वाघमारे, वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे. यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.