चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या उभारणीत मोलाचा सहभाग असलेले ज्येष्ठ सदस्य मा. श्री मोहन रायपुरे सर यांचे 29 नोव्हे. रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पत्रकार संघाच्या वतीने आज त्यांना संघाच्या परिषद कक्षात श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले गेले. अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्नेश्वर, ज्येष्ठ सदस्य बाळ हुनगुंद यांच्यासह उपस्थित सर्वांनी रायपुरे सरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आपली आदरांजली अर्पण केली.
आपल्या संबोधनातून अध्यक्ष संजय तुमराम यांनी स्व. मोहन रायपुरे यांच्या शिक्षण-ज्येष्ठ नागरिक संघ-बौद्ध महासभा-श्रमिक पत्रकार संघ आदी चळवळीत सक्रिय सहभागविषयी गौरवपूर्ण उद्गार काढले. सचिव प्रशांत विघ्नेश्वर, बाळ हुनगुंद यांनी रायपुरे सरांविषयीच्या आपल्या आठवणी विशद केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेेेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर संघाचे सदस्य अमित वेल्हेकर यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


