खबरकट्टा /चंद्रपूर :गडचांदूर :
गडचांदूर या औद्योगिक नगरीत जवळपास ४० हजार लोकांचे वास्तव्य आहे. २० गणपती व १५ देवीचे सार्वजनिक मंडळे आहेत. गणपती व देवी विसर्जन करण्यासाठी लोक अमलनाला धरण येथे जात असतात. अमलनाला धरणाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून तिथे विसर्जन घाट तयार करण्यात यावा अशी मागणी गडचांदूर येथील गणेश मंडळांनी केली आहे.
गडचांदूरच्या अवतीभवती सिमेंट कारखान्यांचे जाळे आहे. या कारखान्यांचा सामाजिक दायित्व निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित असतो. तसेच अमलनाला सौंदर्यीकरण कामासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अनुषंगाने गणपती व देवी विसर्जन घाट होण्यास कोणतीही आर्थिक अडचण नसल्याने विसर्जन घाटाची मागणी जोर धरू लागली आहे. गणेश मंडळाच्या प्रमुखांनी खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांची भेट घेत अमलनाला धरणावर गणपती घाट करण्याबाबत मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन लोकप्रतनिधींकडून मिळाले आहे.
गडचांदूर येथील गणेश मंडळांचे प्रमुख अक्षय मेंढी, नगरसेवक अरविंद मेश्राम, केशव डोह, मनोज भोजेकर , दत्तात्रय बोढाले , अमित पारखी, उमेश भोजेकर, कुणाल पारखी, मयूर बु-हाण , गणेश कवलकर, सुयोग कोंगरे आदींची उपस्थिती होती.