अन् कोलाम युवकांमध्ये चैतन्य स्फुरले #kolam-vikas-foundation - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अन् कोलाम युवकांमध्ये चैतन्य स्फुरले #kolam-vikas-foundation

Share This

  • राजुरा येथे दोन दिवसीय नेतृत्वगुण विकास कार्यशाळा संपन्न
  • कोलाम विकास फाऊंडेशन व शिवाजी महाविद्यालयाचे संयुक्त आयोजन

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा –

अनेक वर्षांच्या जुन्या परंपरा आणि चालीक्तनी तुमच्या डोक्यात कचरा भरविला आहे. तुमची डोकी पार बधीर करून ठेवली आहेत. या डोक्यातला कचरा काढून फेकुन द्या अन् शिक्षण, रोजगाराच्या संधी 'कॅश' करा. आपण कोलाम आहोत किंवा माणिकगड हेच माझं जग आहे या परिघातून बाहेर निघा. मी माणूस आहे आणि या देशाचा मी मालक आहे ही भावना मनात रूजवा. आपले हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे असेल तर स्वतःला सक्षम बनवा असा मोलाचा सल्ला देत सुप्रसिध्द नाट्य दिग्दर्शक हरिष इथापे यांनी कोलाम युवकांमध्ये चैतन्य स्फुरले. निमीत्य होते नेतृत्वगुण विकास मार्गदर्शन कार्यशाळा.

शिक्षणाबाबत फारसी आस्था नसलेल्या कोलाम समुदायातील युवक-युवतींचे समुपदेशन करून, त्यांच्यातील न्युनगंड घालविण्याच्या हेतुने राजुरा येथे कोलाम विकास फाऊंडेशन व शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ व ३ आक्टोंबरला दोन दिवसीय नेतृत्वगुण विकास मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत अतीशय दुर्गम अशा मारोतीगुडा, लेंडीगुडा, कलीगुडा, खडकी, रायपूर, भूरीयेसापूर, सितागुडा, लचमागुडा, कमलापूर, धनकदेवी, कोलामघोट्टा या कोलामगुड्यातील ५२ युवक - युवतींनी सहभाग घेतला. सुपरिचित नाट्य दिग्दर्शक व नाम फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक हरिष इथापे यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.


या कार्यशाळेचे उद्घाटन चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रोहण घुगे यांचे हस्ते करण्यात आले. तर समारोपीय समारंभाला जिल्हा पोलीस उपअधिक्षक शेखर देशमुख, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, प्राचार्य डॉ. संभाजीराव वरकड हे उपस्थित होते.

शाळेत गेल्यानं आमाले का भेटते जी... पोरं शाळेत गेले तं घरचे अन् शेताचे कामं कोनं करावं... गाईचं शेण कोनं काढावं... पाणि भराले बी त्याईची जरूरत हाये... शाळेतली भाषा आमच्या पोराईले समजत नाई अन् आमचा कोलामी भाषा मास्तरले समजत नाई.. पोरगीले शिक्षणाचा का उपेग जी... तीले तं नवरा सांगन थेच कराचं हाये... मग शिक्षणाचा का फायदा बा... २१ व्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही अशी समज बाळगून सतत शोषणाला बळी पडत राहीलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम समुदायाच्या युवक-युवतींमध्ये चैतन्य स्फुरविण्याचा प्रयत्न कार्यशाळेतुन करण्यात आला. या कार्यशाळेतुन बौध्दीक खेळाचे व स्वयंरोजगाराचे धडे देण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यात आदिम कोलाम समुदायाचे ५९ स्वतंत्र गुडे आहेत. या गुड्यांवर आदिम कोलाम समुदाय स्थिरावला आहे. मात्र, शिक्षण व आरोग्याबाबत अनास्था असल्याने हा समुदाय विकासाच्या मुळ प्रवाहापासून अजुनही लांब आहे. या कोलामगुड्यांवरील सोयी-सुविधा व कोलामांच्या वैयक्तिक समस्यांच्या सोडवणूकीसाठी कोलाम विकास फाऊंडेशन सातत्याने प्रयत्नरत आहे.

या संस्थेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कोलामांच्या संघटीत प्रयत्नांना बरेच यश आलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात रस्ता, पाणी, घरकुल अशा मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहीलेल्या अनेक कोलामांना न्याय मिळवून देण्यात संस्थेला यश आले आहे. खडकी कोलामगुड्यावर रस्ता बनला तर रायपूर कोलामगुड्यावर पाणी पोहोचले. अनेक कोलामगुडे रस्त्यानी जोडल्या गेले. आता कोलाम संघटीत होऊन संघर्ष करू लागला आहे. केवळ भौतिक सोयी-सुविधांसाठी लढे उभारून आदिम समुदायाचा विकास शक्य नाही. तर, त्यांच्यात शिक्षण, आरोग्य व रोजगारांची आवड निर्माण करणारी चळवळ उभी करणेही तितकेच गरजेचे आहे या विचाराने प्रेरीत होऊन कोलाम विकास फाऊंडेशनने 'सशक्त कोलाम-समृध्द माणिकगड' हे अभियान सुरू केले.


माणिकगडवरील जंगल व अन्य नैसर्गिक स्त्रौतांचे संरक्षण करणे व विकासापासून दूर राहीलेल्या आदिम कोलाम समुदायात शिक्षण, आरोग्य व रोजगाराबाबत आस्था निर्माण करणे या हेतुने कोलाम विकास फाऊंडेशनचे प्रयत्न सुरू आहेत.



या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कोलाम विकास फाऊंडेशनच्या प्रयत्नांना शिवाजी महाविद्यालयांची भक्कम साथ मिळाली. आणि पहील्याच कार्यशाळेत बाव्वन युवक-युवतींना मार्गदर्शन करणे शक्य झाले. या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डा. राजेश खेराणी, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, प्रा. राजेंद्र मुद्दमवार, प्रा. विठ्ठल आत्राम, फाऊंडेशनचे सचिव मारोती सिडाम, नानाजी मडावी, देवराव सिडाम, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे यांनी परिश्रम घेतले.

Pages