कोरोना बाधितांची संख्या मागील आठवड्यात झपाट्याने वाढली. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. गोंडपिपरी शहरातील व्यापारी मनोज नरहरशेट्टीवार यांची ऐंशी वर्षीय आई कोरोनाबाधित निघाली. त्यामुळे कुटूंबिय धास्तावले होेते.
मात्र, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करुण कोरोनाला हरविले. ती घरी परतली आणि कुटूंबियांनी सणावारासारखे फटाक्याची आतीषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
गोंडपिपरी येथील शशिकला नरहरशेट्टीवार या ऐंशी वर्षिय आईची तब्बेत एका दिवशी बिघडली. तपासणीअंती ती कोरोनाबाधित निघाली. यामुळे नरहरशेट्टीवार कुटुंबिय प्रचंड घाबरले होते. यानंतर कुटूंबातील अन्य सदस्यांनी स्वतःची तपासणी केली. मात्र, त्यांचा अहवाल नकारात्मक आला.
आपल्या आईचं आता कस होणार ? या चिंतेत कुटुंबिय असतांना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ऐंशी वर्षीय आईने कोरोनावर यशस्वी मात केली. त्या सुखरुप होऊन घरी परतल्या. आई परतल्याने कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मुलगा, सुन आणि नातवंडानी घरासमोर फटाके फोडले.
आईची आरती ओवाळली. शेजारच्यांना मिठाईचे वितरण केले. नरहरशेट्टीवार कुटुंबियांच्या आनंदोत्सवाची सद्या गोंडपिपरीसह परिसरात चर्चा आहे. यावेळी मुलगा मनोज नरहरशेट्टीवार, सुन माधूरी नरहरशेट्टीवार, नातवंड मंदार नरहरशेट्टीवार, मधूर नरशेट्टीवार हे कुटुंबिय उपस्थित होते.