20 वर्षांच्या कृतीतून दिले राष्ट्रसंताच्या संदेशाला मूर्तरूप निवृत्त प्राध्यापकाचे श्रमदान सार्थकी तपोभूमीसह गावकऱ्यांवरील जलसंकट टळले#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

20 वर्षांच्या कृतीतून दिले राष्ट्रसंताच्या संदेशाला मूर्तरूप निवृत्त प्राध्यापकाचे श्रमदान सार्थकी तपोभूमीसह गावकऱ्यांवरील जलसंकट टळले#chandrapur

Share This20 वर्षांच्या कृतीतून दिले राष्ट्रसंताच्या संदेशाला मूर्तरूप निवृत्त प्राध्यापकाचे श्रमदान सार्थकी

तपोभूमीसह गावकऱ्यांवरील जलसंकट टळले

खबरकट्टा /चंद्रपूर :

एक हात खोदावी जमीन, हे पुजनाहूनही पूजन, प्रभाव तयाचा अधिक, शेकडो व्याख्यानाहुनही...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेला हा संदेश निवृत्त प्रा. निलकंठ बापूराव लोणबले यांनी कृतीत उरवून दाखवला. मागील २० वर्षांपासून श्रमदान करून तपोभूमीला पाणीदार केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेल्या गोंदोडा (गुंफा) येथील मूळ रहिवासी प्रा. निलकंठ लोणबले हे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे सेवारत होते. त्यांनी एक हेक्टर खडकाळ जागेत सलग समतल चर खोदला. कुठला मोबदला व सन्मानाची अपेक्षा न करता आपल्या गावाची व तपोभूमीचे जलसंकट दूर करण्यासाठी दररोज सकाळी-संध्याकाळी दोन तास व सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी श्रमदान केले.

राष्ट्रसंतांच्या तपोभूमीला पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी 20 वर्षांपासून स्वत: राबत आहेत. त्यांनी एक हेक्टर खडकाच्या जागेत समतल चर खोदला. आरमोरी येथे प्राध्यापक असतानाही नित्यनेमाने गावासाठी ते श्रमदान करत होते. अनेकांनी त्यांची टर उडवली. मात्र ते ध्येयापासून अंतरले नाही. प्रा. लोणबले यांची निष्ठा पाहून गावातील नागरिक तसेच गुरूभक्तांनीही श्रमदान व आर्थिक मदत करू लागले. परिणामी, या ध्येयवादी प्राध्यापकाच्या कृतीतून सुरू झालेल्या काम उपयुक्त ठरले. पाण्याची समस्या कायमची दूर झाली आहे. यासाठी सुधाकर चौधरी, देवराव धारणे, संजय धारणे, चंद्रभान बारेकर, मुरलीधर शेंडे, अनिल गुरनुले, प्रभू धारने यांनी सुरूवातीपासून साथ दिली. त्यामुळे सुरू केलेल्या कामाचे फलित झाले. गावात व तपोभूमीत पाण्याची गंगा वाहू लागली, या शब्दात प्रा. लोनबले यांनी आनंद व्यक्त केला.

*16 पाझर तलावांची निर्मिती :*

तपोभूमी गोंदोडा (गुंफा) परिसरात होलिका बांध, श्रमसंस्कार बांध, गीताचार्य तुकारामदादा बांध, स्मृती बांधासह सन 2002 पासून सूक्ष्म पाणी व्यवस्थापनाद्वारे 16 पाझर तलाव निर्माण करण्यात आले. 2007 पासून शताब्दी बांधाचे काम श्रमदानातून 50 टक्के पूर्ण झाले आहे सद्यस्थितीत 20 फूट खोल व एक हेक्टर जागेत शताब्दी बांधाचा विस्तार झाला. यातही मुबलक जलसाठा आहे.

श्रमदानातून दिनचर्या

प्रा. नीलकंठ लोणबले यांनी स्वत:पासून सुरू केलेल्या श्रमदानाच्या प्रेरणमुळे आता गोंदोडा येथील गावकरी युवक तसेच नवरगाव, वाघेदा, केवाडा, मदनापूर, विहिरगाव आदी गावातील नागरिक, युवक, महिला श्रमदान करू लागले आहेत.